देशभरात धर्मांतर हा विषय गंभीर बनला असून आता अलाहाबाद उच्च न्यायालयानेही यावर टिपण्णी करत चिंता व्यक्त केली आहे. धार्मिक धर्मांतरांवर गंभीर चिंता व्यक्त करत अलाहाबाद उच्च न्यायालयाने इशारा दिला आहे की, अशीच प्रवृत्ती कायम राहिल्यास देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल.
हिंदूंच्या गटाचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केल्याचा आरोप असलेल्या कैलास याचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. “जर ही प्रक्रिया चालू ठेवली तर या देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल. जिथे धर्मांतर होत असेल, भारतातील नागरिकांचा धर्म बदलत असेल तिथे अशा धार्मिक मंडळींना तात्काळ थांबवायला हवे,” असे मत न्यायालयाने मांडले आहे. या घटनांमुळे घटनेच्या कलम २५ मध्ये नमूद केलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे थेट उल्लंघन होते, असंही न्यायालयाने म्हटले आहे. कलम २५ म्हणते की काही निर्बंधांच्या अधीन राहून व्यक्ती कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवण्यास, त्यांच्या धर्माची पूजा करण्यास आणि प्रचार करण्यास स्वतंत्र आहेत.
उच्च न्यायालयाने सांगितले की प्रचाराचा अर्थ धर्माचा प्रचार करणे आहे आणि याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीचे त्याच्या धर्मातून दुसऱ्या धर्मात धर्मांतर करणे नाही. उत्तर प्रदेशातील विविध भागांमध्ये गरिबांची दिशाभूल करून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या घटनांची नोंद घेण्यात आली आहे. आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने हमीरपूर जिल्ह्यातील मौदाहा येथील कैलासला जामीन देण्यास नकार दिला आहे.
हे ही वाचा:
बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ विश्वचषक घेऊन मायदेशी येण्यास सज्ज!
राहुल गांधींच्या आरोपांनंतर नरेंद्र मोदी संतापले, लोकसभेत गोंधळ
४२० कलमाचा अंत आता फसवणुकीसाठी कलम ३१८ !
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारच्या महिलेला घातला सात लाखांचा गंडा
प्रकरण काय?
रामकली प्रजापती याने मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या त्याच्या भावाला एका आठवड्यासाठी कैलाशसोबत उपचारांसाठी म्हणून दिल्लीला पाठवले. त्याने आपल्या भावावर उपचार करून त्याला गावी परत पाठवणार असल्याचे सांगितले परंतु तो परत आलाच नाही. कैलास परत आल्यावर त्याने गावातील सर्व लोकांना दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात नेले जेथे सर्वांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास सांगण्यात आले. प्रजापतीच्या भावाला धर्मांतराच्या बदल्यात पैशांची ऑफर देण्यात आली होती, अशी माहिती आहे. पुढे कैलाश विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.