भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टी २० विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. ‘चॅम्पियन्स! आमचा संघ टी २० विश्वचषक स्टाईलमध्ये घरी आणत आहे. आम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे. हा सामना ऐतिहासिक होता,’ अले त्याने ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. यावेळी त्यांनी भारतीय संघाच्या अभिनंदनाचा व्हिडिओ संदेशही दिला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ‘एक्स’ वर भारतासाठी अभिनंदनपर संदेश दिला आहे. ‘टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे मनापासून अभिनंदन. कधीही हार न मानण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने संघाने कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करत संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्ये दाखवली. अंतिम सामन्यातील हा एक विलक्षण विजय होता. टीम इंडिया आम्हाला तुमचा अभिमान आहे!’ तर, भारतीय संघाच्या नेत्रदीपक विजयाने देश आनंदित झाला आहे, अशी प्रतिक्रिया उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी दिली.
‘टी२० विश्वचषक २०२४मध्ये ‘मेन इन ब्लू’च्या विलक्षण विजयाने संपूर्ण भारत आनंदी झाला आहे! संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने केलेली अप्रतिम कामगिरी त्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाचा पुरावा आहे. त्यांनी अशीच प्रगती करावी, देशाचा गौरव वाढवावा. हार्दिक अभिनंदन!,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘एक्स’वर दिली.
हे ही वाचा:
काल्की २८९८ एडीची घसघशीत कमाई…’पौराणिक’ तडका लागलेल्या चित्रपटांना अच्छे दिन!
लडाखमध्ये रणगाडा सरावावेळी भारतीय सैन्याच्या पाच जवानांना हौतात्म्य !
राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजाना’ सुरु करणार
ट्रम्प बायडेनना म्हणाले, मंच्युरियन. बायडेन म्हणाले तुम्ही ‘पराभूत’
केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनीही भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आणि हा ‘शानदार सांघिक प्रयत्न’ असल्याचे कौतुक केले. ‘१.४ अब्ज भारतीय, हृदयाच्या प्रत्येक ठोक्याने, हा महान विजय साजरा करत आहेत! संपूर्ण राष्ट्र अभिमानाने भारले आहे,’ असे त्यांनी ‘एक्स’वर नमूद केले.
विरोधी पक्षनेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांनीही याबाबत कौतुक केले. ‘विश्वचषकातील विलक्षण विजयाबद्दल आणि संपूर्ण स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! सूर्या, किती शानदार झेल पकडला! रोहित, हा विजय तुझ्या नेतृत्वाचा पुरावा आहे. राहुल, मला माहीत आहे, तुमच्या मार्गदर्शनाला टीम इंडिया मुकणार आहे. या टीमने अवघ्या देशाला अभिमानास्पद विजय मिळवून दिला आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.