राज्यात विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली असून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी दुसरा दिवस आहे. दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशातच विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ दिसून आली.
विधिमंडळ अधिवेशनाचे शुक्रवारचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी हातात बॅनर घेत ‘एक अकेला मोदी, सब पे भारी’, अशा घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ बॅनर हातात घेऊन सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणा दिल्या. नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा देत सत्ताधारी आमदारांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. “घ्या ओ घ्या… विरोधी पक्ष नेत्याचे नाही तर हरल्याचे पेढे घ्या…!” असा संदेश बॅनरवर लिहिण्यात आला होता. शिवसेनेचे काही आमदार हे बॅनर घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे होते.
हे ही वाचा:
‘चंदू चॅम्पियन’ सिनेमा विद्यार्थी, तरुणांना विनामूल्य दाखविण्याची मागणी
देवी यल्लम्माचे दर्शन घेऊन परतणाऱ्या १३ भाविकांवर काळाचा घाला
विरोधकांकडूनही बॅनरबाजी
सत्ताधारी आमदार आंदोलन करत असतानाच विरोधकांनीही घोषणाबाजीला सुरुवात केली. अबकी बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार, शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली पाहिजे, अशा आशयाचे बॅनर झळकावत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा दिल्या. काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट आमदारांनी गाजराच्या माळा हातात घेऊन सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.