पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर पुणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्सची विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्सची विक्री होत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
शनिवारी(२२ जून) रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्टीत ड्रग्स सेवन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तसेच अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एफसी रोडवरील असलेल्या एल-३ नामक हॉटेलमध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरु होती.
हे ही वाचा:
ज्ञानवापीचे सर्वेक्षण करू देणाऱ्या न्यायाधीशांच्या हत्येसाठी इस्लामी कट्टरवाद्यांचा कट
बंगालमध्ये दहशतवादी मॉड्युल उद्ध्वस्त
दारू समजून कीटकनाशकाचे सेवन केल्याने अभिनेत्याचा मृत्यू
रेल्वेच्या सुविधा, प्लॅटफॉर्म तिकिटावर कर नाही!
या हॉटेलच्या बाथरूममध्ये काही अल्पवयीन मुले ड्रग्स सेवन करत असल्याचे दिसून आले. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. काही मुले ड्रग्सचे सेवन करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हॉटेलमध्ये खरंच ड्रग्जची विक्री होते आहे का?, पुणे पोलीस यावर काही कारवाई करणार आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागून होत. अखेर पुणे पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. एल- ३ हॉटेलचा मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
मुख्यमंत्र्यांचा इशारा
ड्रग्स प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा दिला आहे. जिथे ड्रग्स सापडणार तिथे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेनी दिली आहे. ड्रग्समुक्त महाराष्ट्र व्हावा ही सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. अशा प्रकरणांमध्ये तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून पोलीस कारवाई करतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या आशीर्वादाने हे सर्व सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तसेच मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले आहेत.