पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार तरुणांसाठी काही करत नाही, रोजगार निर्मिती करत नाही, या सरकारने तरुणांचे लोणचे घातले आहे, असा नरेटीव्ह निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न काँग्रेस आणि त्यांचे चट्टेबट्टे करत आहेत. २०२४ च्या NEET परीक्षांची प्रश्नपत्रिका फुटली, त्यानंतर या नरेटीव्हला आणखी हवा देण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस नेत्या प्रियंका वाड्रा यांनी आरुषी पटेल या विद्यार्थीनीचा एक व्हीडीओ ट्वीट केला, ती तरुणीच फ्रॉड असल्याचे नंतर उघड झाले. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर तोंडसुख घेतले. आदित्य ठाकरेंनी लगेच मम म्हटले. आता या घोटाळ्यात तेजस्वी यादव यांचा ओएसडी गुंतला असल्याचे उघड झाले आहे. या घटनाक्रमाचे तात्पर्य असे आहे की, तरुणांमध्ये अस्वस्था निर्माण व्हावी, म्हणून कांड करणारेच तरुणांचे मसीहा बनून मोदींच्या विरोधात ओरड करतायत.
मोदी सरकार उलथवायचे असेल तर तरुणांची माथी भडकवायला हवीत. एकदा का तरुण बिथरले तर देशात अराजक माजवणे सोपे होईल आणि सरकार आपोआप अस्थिर होईल, अशी बहुधा विरोधकांची व्ह्यूहरचना असावी. NEET पेपरफुटी प्रकरणात काँग्रेस नेते तापलेल्या तव्यावर पोळी शेकण्याच्या प्रयत्नात असताना या विषयाचे बुमरॅंग होईल, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’, असे चित्र समोर येण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये राजद आणि लालू यांचे सरकार असताना ऑक्टोबर २०२३ मध्ये पोलिस कॉन्सेटबल पदे भरण्यासाठी झालेल्या परीक्षांचे पेपर फुटले. परंतु, काँग्रेस नेते राहुल गांधी तोंड दाबून बसले होते. तेव्हा तरुणाईचे नुकसान होते आहे, असा कोणताही विचार राहुल गांधी यांच्या मनात डोकावलाही नाही, कारण त्यावेळी सरकारमध्ये काँग्रेस पक्ष सहभागी होता. इंडी आघाडीची गँगही चिडीचूप होती, कारण मोदींवर खापर फोडण्याची सोय नव्हती. राजकारणाची पोळी शेकता येत नव्हती. आता NEET परीक्षेचे पेपर फुटले. बिहारमध्ये त्याचे धागेदोरे सापडलेले आहे. परंतु, आता तिथे रालोआची सत्ता असल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कंठ फुटलेला आहे.
नीट यूजीच्या परीक्षेला देशभरातील ३३ लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षेच्या आधी १ मे रोजी पाटण्यातील नॅशनल हायवे अथॉरीटीचे गेस्ट हाऊस एका नेत्याच्या सचिवाने या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित केले होते. त्यांना इथेच प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर सगळे पेपर जाळून टाकण्यात आले. पुरावे नष्ट करण्यात आले. गेस्ट हाऊसमध्ये बुकिंगसाठी कोणाचे पत्र देण्यात आले नव्हते. परंतु, त्या सचिवाने गेस्ट हाउसचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप कुमार यांना मोबाईलवरून फोन केला होता. हा फोन बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे स्वीय सचिव प्रीतम कुमार यांनी केला होता, असा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी केला आहे. सिकंदर प्रसाद यादवेंदु हा याप्रकरणाच मास्टर माईंड असून त्याचे लालू यादव यांच्या परिवाराशी घनिष्ट संबंध आहेत. यादवेंदु याची पाटण्यातील बदली तेजस्वी यादव यांनीच केली होती. या रॅकेटने विद्यार्थ्यांना हे पेपर ४० लाख रुपयांना विकले होते. याप्रकरणात पेपर विकत घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून त्यांनी या माहितीची पुष्टी केलेली आहे. आपल्यासाठी सरकारी गेस्ट हाऊस बुक करण्यात आले होते आणि तिथेच आम्हाला प्रश्न पत्रिका देण्यात आल्या. उत्तरांची घोकंपट्टी करून घेण्यात आली असल्याचा जबाब नोंदवला आहे. याचा अर्थ पेपरफुटीचे धागेदोरे या सरकारी गेस्ट हाऊसपर्यंत पोहोचतायत ही बाब नक्की आहे. प्रश्न एवढाच उरला की, याप्रकरणात फक्त तेजस्वी यादव यांचा सचिव सहभागी आहे की तेजस्वी यांचाही या प्रकरणात सहभाग आहे.
३३ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. अर्थात मोठ्या संख्येने तरुणांना या पेपर फुटीची झळ बसलेली आहे. उच्च शिक्षणासाठी लाखो विद्यार्थी सगळी छानछौकी बाजूला ठेवून मेहनत घेत असतात. सणवार, सिनेमा, सगळे बाजूला ठेवून अभ्यास करत असतात. काही जणांनी हा पैसे कमवण्याचा धंदा बनवला आहे. ज्यांची लायकी नाही, अशा विद्यार्थ्यांचे पालक पैसे फेकून त्यांच्यासाठी यशाचा मार्ग प्रशस्थ करण्याच्या मागे लागले आहेत. विद्यार्थ्यांना या दुष्ट चक्रातून सोडवण्याची गरज आहे. हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. परंतु काँग्रेस पक्षाने या विषयाचे राजकारण सुरू केलेले आहे. राहुल गांधी यांनी पेपर फुटीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. राजस्थानमध्ये गहलोत सरकारच्या काळात हे राज्य पेपरफुटीच्या प्रकरणात देशात नंबर वन होते याचा बहुतेक त्यांना विसर पडला असावा.
मोदींच्या प्रयत्नांमुळे रशिया युक्रेन युद्ध बंद थांबल्याच्या बाता मारल्या जातात. परंतु, त्यांना ही पेपरफुटी काही रोखता येत नाही, अशी मखलाशी केली. तेजस्वी यादव यांचे नाव या प्रकरणात आल्यानंतर राहुल गांधी यांची भाषा बदलली. याप्रकरणात कोणीही दोषी आढळल्यास कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. कोणतीही आघाडी असली तरीही बिहारच्या मुख्यमंत्री पदावर आरुढ असणारे पलटूराम नितीशकुमार यांनी तर याप्रकरणी तोंडात मळी भरल्यासारखे मौन धारण केलेले आहे. पुन्हा कधी पलटी मारण्याची वेळ आली तर अडचण नको म्हणून ते तेजस्वीमधला ‘त’ही बोलायला तयार नाहीत.
हे ही वाचा:
वटपौर्णिमेमुळे मोठा अनर्थ टळला; सोलापुरमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट
मुकेश अंबानींचा डीप फेक व्हिडीओ वापरून डॉक्टरची फसवणूक
भारत खेळणार बांग्लादेश, न्यूझीलंडविरोधात कसोटी मालिका
सुपर ८ ची विजयी सुरुवात; भारताचा अफगाणिस्तानवर विजय
तरुणांमध्ये असंतोष निर्माण कऱण्यासाठी या प्रकरणाचा फायदा होईल हे लक्षात घेऊन काँग्रेसने या प्रकरणाला हवा देण्याचा प्रयत्न केला. प्रियांका वाड्रा यांनी आयुषी पटेल नावाच्या एका तरुणीचा व्हिडीओ ट्विट केला. जिने असा दावा केला होता की उत्तर पत्रिका फाटल्यामुळे एनटीए (नॅशनल टेस्टींग एजन्सी) आपला निकाल जाहीर करण्यात असमर्थ ठरली. अहमदाबाद न्यायालयात तिने याचिका दाखल केली. एनटीएने तिची मूळ उत्तर पत्रिका सादर केल्यानंतर तिचे बिंग फुटले. तिने सादर केलेली कागदपत्र बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर न्यायालयाने तिच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. न्यायालायच्या आदेशानंतर चुकीचा व्हिडीओ ट्विट केल्याबद्दल ना देशाची माफी मागितली ना ट्विट डिलीट केला.
या सगळ्या घडामोडींवरून एक बाब स्पष्ट आहे. तरुणांची माथी भडकावणे हा काँग्रेसचा अजेंडा आहे. त्यासाठी केंद्र सरकारनेच चुका करायवा हव्या असे नाही, आपण चुका करायच्या आणि केंद्र सरकारवर खापर फोडायचे असे प्रकार करायला इंडी आघाडीतील नेते मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे देशात अराजक माजले तरी चालेल. देश पेटला तरी चालेल. परंतु, मोदींना सत्तेवरून हटवणे एवढाच यांचा अजेंडा आहे. पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड सिकंदर प्रसाद यादवेंदु याचा ग़ॉडफादर कोण? हे चौकशीत उघड होईलच. जो कोणी असेल त्याची रवानगी विनाविलंब तुरुंगात व्हायला पाहीजे. विजय सिन्हा हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याप्रकरणी तेजस्वी यादव यांच्याकडे बोट दाखवले आहे. उगाच राजकारण करण्यापेक्षा त्यांना गजाआड करा आणि कारवाई करा. अफवा पसरवणाऱ्यांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत अफवांचा बाजार गरम राहणार. अफवा पसरवण्याची गोड फळं काँग्रेसने चाखली आहेत, त्यामुळे राहुल आणि प्रियंका यांच्यासारखे नेते या अफवांना हवा देण्याचे काम करत राहाणार.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)