30 C
Mumbai
Saturday, October 26, 2024
घरसंपादकीयमहाराष्ट्रात सुरू झालाय ‘फेक नरेटीव्ह सिझन-२

महाराष्ट्रात सुरू झालाय ‘फेक नरेटीव्ह सिझन-२

Google News Follow

Related

तकलादू बातम्यांच्या आधारावर नरेटीव्ह बांधायचे, खोटारडी विधाने करायची, त्या बिनबुडाच्या विधानांची पुन्हा पाळीव मीडियाने बातम्या करायच्या आणि हा नरेटीव्ह मजबूत करत न्यायचा असे दुष्टचक्र देशात सुरू आहे. महाराष्ट्रात हा प्रकार जरा जास्तच जोरात सुरू आहे. मिड-डे या दैनिकात ईव्हीएमच्या विरोधात बातमी छापून आली. त्यावरून विरोधकांनी गदारोळ घालायला सुरूवात केली. निवडणूक आयोगाने तातडीने या बातमीचा खुलासा केला आणि संबंधित वृत्तपत्राला नोटीस जारी केलेली आहे. देशात पुढची पाच वर्षे पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार राहणार आहे, हे स्पष्ट झाल्यामुळे आलेले नैराश्य विरोधक ईव्हीएमवर खापर फोडून व्यक्त करत आहेत. विधानसभा निवडणुकांपर्यंत ही आदळआपट अधिक तीव्र होणार आहे.

मिड-डे मध्ये बातमी आली नसती तर ही मंडळी ईव्हीएमवर बोलली नसती का? शक्यच नाही. नैराश्य बाहेर काढण्यासाठी त्यांना काही तरी निमित्त हवेच होते. ते मिड-डे ने दिले. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ गेले काही दिवस प्रचंड चर्चेत आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तिकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव केला. हा पराभव उबाठा शिवसेनेला प्रचंड सलतो आहे. उद्धव ठाकरे यांचे व्यावसायिक पार्टनर असलेल्या वायकर यांना आता आदित्य ठाकरे यांनी गद्दारांच्या यादीत ढकललेले आहे.

४ जून रोजी गोरेगावच्या नेस्को मध्ये मतमोजणी सुरू असताना उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडीलकर तिथे मोबाईल घेऊन शिरला. हा ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल होता. असा दावा मिड-डे या वृत्तपत्राने केला आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी पंडीलकर आणि पोलिंग ऑफीसर दिनेश गुरव या दोघांवर गुन्हा दाखल केला. रिटर्निंग ऑफीसर वंदना सुर्यवंशी यांनी मिड-डेला याप्रकरणी नोटीस बजावली आहे. ईव्हीएम मशीनमध्ये कोणत्याही प्रकारे वायरलेस कम्युनिकेशन क्षमता नाही. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही मोबाईलवर ओटीपी येत नाही, असे स्पष्ट केले.

सुर्यवंशी बाईंनी जे काही सांगितले ते अनेक मराठी पत्रकारांच्या डोक्यात शिरले नाही. हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी जुने मोबाईल आणि सध्या अस्तित्वात असलेल्या स्मार्ट फोनचे उदाहरण देता येईल. पूर्वीच्या फोनमध्ये एन्ड्रॉईड किंवा आयओएस या दोन्ही सिस्टीम नसायच्या. इंटरनेट वापरता यायचे नाही. त्यामुळे हा फोन हॅक करता येत नव्हता. सध्याचे फोन हॅक करता येतात कारण त्यात इंटरनेटचा वापर असतो. त्यामुळे आजही काही बडे लोक स्मार्ट फोन न वापरता तोच जुना फोन वापरतात.

ईव्हीएम हॅक का करता येत नाही, त्याचे हे साधे आणि सरळ कारण आहे. आता या विषयावरून पुन्हा ईव्हीएमचा विषय उकरून काढला जातो आहे. ईव्हीएम जर हॅक झाले असते तर भाजपाला फक्त २४० जागा का मिळाल्या असत्या भाजपाने ४०० पार… चे लक्ष्य सहज गाठले असते. ईव्हीएम हॅक करण्याचे जाहीर आव्हान काही वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने दिले होते. तेव्हा एकाही राजकीय पक्षाला ते पेलवले नाही. आता हरल्यावर त्यांना पुन्हा खुमखुमी आलेली आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकते यावर जर त्यांना एवढा विश्वास असेल तर त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगालाला आव्हान देऊन पाहावे. ईव्हीएम वापरणे घटना विरोधी आहे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिली.

हे ही वाचा:

ईव्हीएम हॅकचे खोटे आरोप करणाऱ्या राहुल गांधी, आदित्य ठाकरेंनी माफी मागावी

बकरी ईदला लज्जास्पद कृत्य, बळीच्या बोकडावर लिहिले ‘राम’

‘बळीं’च्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश!

जम्मू-काश्मिरातील रियासी हल्ल्याची तपासणी एनआयएच्या हाती!

मतदानासाठी ज्यांना टेक्नॉलॉजीचा वापर अमान्य आहे, अशा लोकांनी संवाद साधण्यासाठी पोस्टकार्डचा वापर करायला हवा, परंतु ते वापरतात व्हॉट्सएप, टेलिग्राम, परंतु निवडणूक त्यांना बॅलेटवरच हवी. स्पेसेक्सचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी ईव्हीएमवर केलेल्या टीप्पणीनंतर देशातील विरोधी पक्ष नेत्यांच्या हाती कोलीत मिळाले आहे. माजी माहीती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांना उत्तर दिलेले आहे. परदेशातील ईव्हीएमप्रमाणे भारतात इंटरनेटचा वापर करण्यात येत नसल्याने ते हॅक करता येत नाही, असे त्यांनी सांगितले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मस्क यांची री ओढली. त्यांना बोलायला निमित्त मिळाले.

लोकसभा निवडणुकी आधी ईव्हीएमवरून देशात मोठा गलका सुरू होता. ईव्हीएम हॅक करून भाजपा निवडणुका जिंकणार, असा दावा विरोधी पक्षातील नेते करत होते. कारण भाजपाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळणार अशा प्रकारचा अंदाज सर्वच वृत्तवाहीन्या व्यक्त करत होत्या. प्रत्यक्षात भाजपाला २४० जागा मिळाल्या. जदयूचे नेते नीतीश कुमार आणि तेलगू देशम् चे नेते चंद्राबाबू नायडू यांना आपण सहजपणे इंडी आघाडीच्या बाजूने वळवू असा विश्वास अनेकांना होता. प्रत्यक्षात हे दोघेही मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभे राहीले. त्याच मुळे हा पोटशुळ उठलेला आहे. प्रश्न हा आहे की खोट्याच्या पुड्या बांधणाऱ्यांवर कारवाई होणार आहे का? की खोटे विकण्याचा हा धंदा अव्याहत सुरू राहाणार आहे?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा