दक्षिण गाझामध्ये रफाह सीमेजवळ इस्रायली सैन्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात आठ सैनिक ठार झाले. या हल्ल्यामुळे हमासशी लढताना मारल्या गेलेल्या इस्रायली सैनिकांची एकूण संख्या ३०७ वर पोहोचली आहे. लष्कराने आपल्या सैन्यातील एका सदस्याची ओळख २३ वर्षीय कॅप्टन वसेम महमूद म्हणून केली आहे, जो कॉम्बॅट इंजिनिअरिंग कॉर्प्समधील उप कंपनी कमांडर आहे. हुतात्मा झालेल्या अन्य लष्करी अधिकाऱ्यांबाबत अद्याप पुरेशी माहिती मिळालेली नाही.
इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, रात्रभर चाललेल्या लष्करी मोहिमेनंतर विश्रांती घेण्यासाठी सर्व सैनिक एका सशस्त्र गाडीतून (कॉम्बॅट इंजिनीअरिंग व्हेइकल) आधीच ताबा घेतलेल्या इमारतींकडे जात असताना हल्ला झाला आणि यात ते सर्व मारले गेले. त्यांचा काफिला पुढे जात असताना अचानक मोठा स्फोट झाला, असे वृत्त टाइम्स ऑफ इस्रायलने दिले आहे.
हमासने यापूर्वी जाहीर केले होते की, त्यांच्या सैनिकांनी रफाहच्या पश्चिमेकडील तेल अल-सुलतान भागात सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला करून अनेक इस्रायली सैनिकांना ठार केले आणि जखमी केले.
इस्रायली सैन्य गेल्या अनेक आठवड्यांपासून रफाह प्रदेशात आगेकूच करत आहे. त्यांच्या हल्ल्यात शनिवारी किमान १८ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. रफाहमधील इस्रायलच्या सैन्याने जमिनीच्या वर आणि हमासने बांधलेल्या बोगद्यांमध्ये लपवून ठेवलेली मोठ्या प्रमाणातील शस्त्रे हस्तगत केली आहेत.
हे ही वाचा..
पाऊस आला धाऊन सामना गेला वाहून! भारताचा गटसाखळीतील शेवटचा सामना रद्द
निवडणूक होताच काँग्रेसचा खरा चेहरा उघड; कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ
उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात १० हून अधिक भाविकांचा मृत्यू
ठाण्यातून ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेविका मुख्यमंत्री शिंदेच्या गटात सामील!
युद्धविरामासाठी हमास आणि इस्रायलदरम्यान चर्चा सुरू असतानाच इस्रायलच्या आठ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे युद्धबंदीची मागणी वाढेल आणि इस्रायली नागरिक संतप्त होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक नेते गाझामध्ये युद्धविरामासाठी दबाव आणत आहेत. हमासला युद्धाचा कायमचा अंत आणि इस्रायलची संपूर्ण गाझामधून माघार ही आहे. तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा नायनाट होण्यापूर्वी युद्ध संपवण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही पक्षांमध्ये युद्धविराम करारावर चर्चा सुरू आहे.