लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला काही ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःवर घेतली असून आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा निर्धार केला आहे. पुढील तीन महिन्यांवर येऊन घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी गुरुवार, १३ जून गुरुवारी मुंबईत भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले. या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी आता आपण विधानसभेच्या विजया नंतरच गळ्यात हार घालणार असा निर्धार केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणाही साधला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधानसभेची निवडणूक तर जिंकूच, मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही जिंकू. पालिकेवर आपलाच भगवा फडकणार. फेक नरेटीव्हचा पराभव करण्यासाठी आगामी निवडणूक महत्वाची आहे. मुंबईकरांचे प्रेम महायुतीला आहे. मतदारांनी २६ लाख मत महायुतीला दिली तर महाविकास आघाडीला २४ लाख मत दिली. मराठी माणसाने महाविकास आघाडीला मतदान केलेलं नाही. मविआने फेक नरेटिव्ह तयार केला, त्याला आपण उत्तर देऊ शकलो नाही. हे इतकं प्रभावी ठरणार याचा अंदाज लाऊ शकलो नाही. पण फेक नरेटिव्ह एकदा चालतो, सारखा सारखा चालत नाही, तो बाऊन्स बॅक होतो, ‘व्ही आर डाउन, बट व्ही आर नॉट आऊट’,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्रातही पॉलिटिकल अर्थमॅटिक आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे. पण, मतांमध्ये कुठेही कमतरता पडली नाही. आपल्या ४३.६ टक्के त्यांना ४३.९ टक्के आहे. त्यामुळे त्यांना विजय मिळाल्याचा आभास तयार करता आला. भाजपाच्या १३ जागा अशा आहेत ज्या चार टक्केंपेक्षा कमी मतांनी आपण हरलो आहोत. जे जिंकले त्यांना शुभेच्छा आहे. आता आपल्याला जे मिळालंय ते पुढे घेऊन जाऊ. कधी कधी मेरिटमध्ये पास होणारा मुलगा डिस्टिंक्शनमध्ये ७५ टक्के मिळाले तरीही लोकांना वाटतं मेरिटचा मुलगा होता. तर जो ३५ टक्के मार्क मिळवतो त्याला ४० टक्के मिळाले तर लोक त्याची हत्तीवरुन वरात काढतात. संपूर्ण इंडिया आघाडी मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्याहून जास्त जागा भाजपाला मिळाल्या. आपली लढाई फेक नरेटिव्हशी होती. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी इंडिया आघाडीशी हरलो नाही, फेक नरेटिव्हमुळे कमी पडलो आहे,” असा विश्वास देत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले.
हे ही वाचा..
फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवरायांची बखर !
घुसखोर बांगलादेशींना हुडकून हाकलून लावा
पावसाच्या हजेरीमुळे मुंबईत वाहतूक कोंडी!
पंतप्रधान मोदी श्रीनगरमधील दाल सरोवराच्या काठावर योग दिन साजरा करणार?
“मुंबईत लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या चार जागा कुठून आल्या हे नीट पाहिलं तर लक्षात येईल की सामान्य मुंबईकर आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही. मुंबईत असलेल्या, चार पिढ्या मुंबईकर असलेल्या उत्तर भारतीयांनी मतदान केलेलं नाही. त्यांना नेमकं कुठून मतदान मिळालं तर लक्षात येईल की मागचे चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते, ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो म्हणणं सोडलं होतं. तसंच ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणं सोडून जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं. केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी अर्थमॅटिक जिंकलं आहे,” असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.