पाकिस्तानचे राज्यसभेचे खासदार शिबली फराझ यांनी संसदेतील वरच्या सभागृहात भारताच्या कार्यक्षम निवडणूक प्रक्रियेची प्रशंसा केली आणि शांततापूर्ण सत्ता हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी पारदर्शक निवडणुका घेण्यास सक्षम नसल्याबद्दल स्वतःच्या देशावर टीका केली.
‘तिथे (भारतात) नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. ८० कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले आहे. तेथे हजारो मतदान केंद्रे होती. अगदी दुर्गम भागात राहणाऱ्या व्यक्तीसाठी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. निवडणूक एक महिना चालली आणि ईव्हीएमचा वापर करण्यात आला. मात्र निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे एकानेही म्हटले नाही. आम्हालाही त्याच पद्धतीने प्रगती करायची आहे,’ असे शिबली फराझ म्हणाले.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे सदस्य फराज यांनी पूर्वीच्या इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. पाकिस्तानच्या निवडणुकीतील असंख्य वादांवरही त्यांनी खेद व्यक्त केला, जिथे पराभूत उमेदवारांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिला.
फराझ यांनी राजकीय व्यवस्था ‘पोकळ’ बनवण्यासाठी पाकिस्तानातील खराब निवडणूक संस्कृतीला जबाबदार धरले. पाकिस्तान अशा मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका का घेऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘मुस्लीम लीग आणि एमक्यूएमसह सर्व पक्षांच्या निहित स्वार्थांमुळे हे घडले आहे,’ असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानच्या खासदाराने हे विधान केले आहे. याउलट, पाकिस्तानमधील फेब्रुवारीच्या निवडणुकीत इस्लामिक रिपब्लिकमध्ये व्यापक अराजकता माजली. ज्या निवडणुकांमध्ये पीटीआयला लढण्यास मज्जाव करण्यात आला होता, त्यामध्ये फसवणूक, उमेदवारी अर्ज हिसकावून घेणे, उमेदवार आणि समर्थकांची मनमानीपणे अटक करणे, उमेदवारी अर्ज नाकारणे आणि प्रचाराच्या कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आणणे असे आरोप झाले होते.
हे ही वाचा..
तिसऱ्या कार्यकाळातील पहिली भेट इटलीला दिल्याचा आनंद
‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या ऍडिशनल प्रोग्रॅम सेक्रेटरी पदी संजय ढवळीकर यांची नियुक्ती!
सरसंघचालकांचे खडे बोल, नेमके कोणासाठी?
दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर द्या: पंतप्रधानांच्या सूचना
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे तब्बल १३०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मतमोजणी सुरू होऊन अनेक दिवस उलटूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी अनेक जागांचे निकाल जाहीर केले नाहीत. युनायटेड नेशन्स आणि ह्युमन राइट्स वॉच सारख्या निरीक्षकांनीही पाकिस्तानमधील निवडणुकीपूर्वी मतदानपूर्व गोंधळाकडे लक्ष वेधले.