भारत आणि अमेरिकेदरम्यान बुधवारी रात्री उशिरा क्रिकेटच्या मैदानावर असे काही झाले, जे पूर्वी कधीही झाले नव्हते. चेंडू आणि धावांमधील अंतर हळूहळू वाढत चालले होते. भारताला ३० चेंडूंवर ३५ धावा हव्या होत्या. तेव्हा अचानक पंचांनी सांगितले की, अमेरिकेच्या संघावर पाच धावांची पेनल्टी लावली जात आहे. त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताची धावसंख्या अवघड खेळपट्टीवर बरोबरीवर पोहोचली. आता भारताला ३० चेंडूंवर ३० धावा करायच्या होत्या. त्यामळे तेव्हा फलंदाजी करणारे सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांना भारताचा विजय पक्का करणे सुलभ झाले.
अमेरिकेने अशी कुठली चूक केली, जी क्रिकेटच्या मैदानावर यापूर्वी कोणत्याही संघाने केलेली नाही, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. तर, एक षटक संपल्यावर दुसरे षटक टाकण्यादरम्यान प्रत्येक संघाला ६० सेकंदांची वेळ दिली जाते. जर एखाद्या संघाने ही चूक तीनवेळा केली, तर पंच त्या संघाला पाच धावांची पेनल्टी ठोठावू शकतो. अमेरिकेच्या संघाने एकवेळ नाही तर तीनवेळा ही चूक केली. त्यामुळे संघाचे नुकसान झाले.
हे ही वाचा:
अमेरिकेला पराभूत करून भारताची सुपर आठमध्ये धडक
हिंदू यात्रेकरूंवरील हल्लाप्रकरणी विहिंप, बजरंग दल आक्रमक!
मुख्यमंत्री महोदय, वक्फ बोर्डाला १० कोटी देऊन मतं मिळतील का?
मोहन माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री!
आयसीसीचे मत
आयसीसीनेही याबाबत मत व्यक्त केले आहे. ‘जर गोलंदाजी करणारा संघ मागील षटक संपल्यानंतर ६० सेकंदाच्या आत पुढचे षटक टाकण्यास तयार नसेल आणि हे तीनवेळा झाले तर संघावर पाच धावांची पेनल्टी लागेल,’ असे आयसीसीने नमूद केले आहे. पंचांनी स्टॉप-क्लॉकच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेचा उपकर्णधार आरोन जोन्सला दोनवेळा इशारा दिला होता. अखेर तीनवेळा असे झाल्यानंतर पंचांनी पाच पेनल्टी धावांचा आदेश दिला.