उत्तर प्रदेशातील अयोध्येत बहुप्रतीक्षित असे राम मंदिर निर्माण झाल्यानंतर या शहराला आणि मंदिराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातून या मंदिराला भेट द्यायला आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यायला भाविक येत असतात. राम मंदिरामुळे अयोध्येचे देशात आणि जगात स्वतःचे वेगळे स्थान आहे. अशा परिस्थितीत अयोध्येतील सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून या सुरक्षेसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता येथे एनएसजी हब तयार करण्यात येणार आहे. दहशतवादाचा धोका आणि त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. अयोध्येत तयार होणाऱ्या एनएसजी हबमध्ये ब्लॅक कॅट कमांडो तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘झी न्यूज’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. एनएसजीला अयोध्येतील दहशतवादविरोधी आणि अपहरणविरोधी कारवायांची विशिष्ट जबाबदारी देण्यात येणार आहे, ज्याचे काम एनएसजी खूप चांगले करत आहे. अयोध्येत एनएसजी हब स्थापन करण्याच्या दिशेने सरकार वेगाने काम करत आहे. अयोध्येतील राम मंदिराची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्याची तयारी सुरू आहे.
अयोध्या एनएसजीचे सुरक्षा केंद्र बनणार असल्याची माहिती आहे. अयोध्येची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा तत्वतः निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याप्रकरणी जमीन देणार आहे. एनएसजीची तुकडी अयोध्येत तैनात करण्यात येणार असून अयोध्येच्या सुरक्षेची संवेदनशीलता लक्षात घेऊन ब्लॅक कॅट कमांडो तैनात करण्यात येणार आहे.
आतापर्यंत राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पीएसी जवान दर दोन महिन्यांनी बदलले जात असल्याची माहिती आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी पीएसीच्या आठ कंपन्या यूपी एसएसएफला देण्यात आल्या आहेत. एटीएसची तुकडी सुद्धा अयोध्येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या व्हीआयपी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एनएसजीच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटकडून ही जबाबदारी पूर्णपणे काढून घेऊन सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटकडे सोपवण्याची तयारी सुरू आहे.
हे ही वाचा:
आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक; मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं
डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये पुन्हा अग्नितांडव!
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकारला पदभार; जुलैमध्ये सातव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प
अठराव्या लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून
याबाबत गृहमंत्रालयात बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या असून, लवकरच याबाबत निर्णय होऊ शकतो. दरम्यान, एनएसजी सध्या ९ व्हीआयपींना सुरक्षा पुरवत आहे. एनएसजीच्या व्हीआयपी सुरक्षा युनिट, स्पेशल रेंजर ग्रुपचे (SRG) कर्तव्य पूर्णपणे सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटकडे सोपवण्याची योजना आहे.