मराठा समाजाला सगेसोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे हे पुन्हा एकदा गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जरांगे यांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्याबाबत सरकार गंभीर आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारकडून कारवाई सुरू आहे. यापूर्वी त्यांना जाळपोळीच्या घटना सोडून इतर आंदोलकांवर असलेल्या काही केसेस परत घेण्याचे आश्वासन दिले होते त्यावर जलद गतीने प्रक्रिया सुरू आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांची जी मागणी आहे त्याबाबत देखील सरकारने पहिले नोटिफिकेशन जारी केलेले असून त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे ओबीसी नेत्यांशी चर्चा करत असून छगन भुजबळ यांच्याशी देखील चर्चा करून त्यांना समजावून सांगणार आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना सर्टिफिकेट देता येतं. सर्वोच्च न्यायालयाने जे निकष ठरवून दिलेत त्यात बसणारच नोटिफिकेशन काढण्यात आले. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. या प्रश्नी मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये पुन्हा अग्नितांडव!
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकारला पदभार; जुलैमध्ये सातव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प
अठराव्या लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून
जम्मू-काश्मीर बस हल्ल्यामधील एका दहशतवाद्याचे रेखाचित्र पोलिसांनी केले प्रसिद्ध
ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं पाहिजे असे मत आहे. आरक्षणाबाबत सरकार नेहमीच सकारात्मक राहिलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे यानंतर आता मनोज जरांगे यांची भूमिका काय असेल याकडे लक्ष असणार आहे.