नरेंद्र मोदी हे रविवार, ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यासोबतच काही मंत्रीही शपथ घेणार आहेत. यात महाराष्ट्रातूनही काही भाजपा आणि शिवसेना खासदारांची वर्णी लागली आहे. मात्र, त्यांच्या आताच्या मंत्रीमंडळात मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला संधी मिळालेली नसल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भाजपाच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एक जागा देण्यात येणार होती. तसा प्रस्ताव त्यांना दिला होता. राज्यमंत्री स्वतंत्र्य प्रभार, अशी ही जागी होती. मात्र, त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळावं, असा त्यांचा आग्रह होता. प्रफुल्ल पटेल यांचे नाव अंतिम करण्यात आलं असून ते यापूर्वी मंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद देता येणार नाही, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं, त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळात अजित पवार गटाचा समावेश नसेल,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे असंही म्हणाले की, “जेव्हा युतीचं सरकार असतं तेव्हा काही निकष तयार केले जातात. एका पक्षासाठी असे निकष मोडता येत नाहीत. त्यामुळे भविष्यात जेव्हाही केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला जाईल, यासंदर्भात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलणं झालं, तेव्हा आम्हाला यावेळी शक्य नसेल तर पुढच्या वेळी पण केंद्रीय मंत्रीपद द्या असं सांगण्यात आलं,” असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
हे ही वाचा:
जम्मूच्या ज्वेलर्सने नरेंद्र मोदींसाठी बनवले चांदीचे कमळ!
काँग्रेसची ‘खटाखट योजना’ म्हणजे मतदारांना लाच देणे; ९९ खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी
एअर कॅनडाच्या विमानाला टेकऑफनंतर आग; विमान सुरक्षितपणे उतरवण्यास यश!
काँग्रेसच्या प्रमुखांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण!
तसेच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जे खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, त्यांचे अभिनंदनही केले. नितीन गडकरी, पीयुष गोयल, रामदास आठवले हे पुन्हा एकदा मंत्री बनणार आहेत. याशिवाय रक्षा खडसे तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यासारखे तरुण खासदार मंत्रीमंडळात सहभागी होत असल्याचा आनंद आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.