भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार लवकरच सत्ता स्थापन करणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरातील नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
दोन्ही देशांमध्ये मैत्री आणखी दृढ होत आहे- बायडेन
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएचे त्यांच्या विजयासाठी खूप खूप अभिनंदन,’ अशा शब्दांत बायडेन यांनी मोदी यांचे अभिनंदन केले आहे. बायडेन यांनी देशातील मतदारांचेही आभार मानले आहेत. आमच्या दोन्ही देशांमधील मैत्री आणखी दृढ होत आहे, आम्ही अमर्यादित क्षमतेचे भविष्य घडवू पाहात आहोत,’ असेही बायडेन म्हणाले.
सुनक यांची हिंदीत पोस्ट
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांनीही मोदी यांचे अभिनंदन केले. त्यांनी मोदी यांच्याशी संवाद साधून त्यांचे विजयासाठी अभिनंदन केल्याचे सांगितले. ‘ब्रिटन आणि भारत यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे. आम्ही एकत्र येऊन ही मैत्री घट्ट करू,’ अशी पोस्ट त्यांनी हिंदीत केली.
पुतिन यांच्याकडूनही अभिनंदन
भारताच्या सर्वांत जुन्या मित्रांपैकी एक असणारे रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनीही मोदी यांचे कौतुक केले. ‘लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबद्दल तुमचे अभिनंदन. माझ्या अभिनंदनाचा स्वीकार करा. आम्ही भारतासोबत विशेषाधिकार प्राप्त व्यूहात्मक भागिदीराला खूप महत्त्व देत आहोत. तुम्हाला चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभो,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मॅक्रो यांनी मोदींसोबतचे छायाचित्र केले पोस्ट
फ्रान्सचे राष्ट्रपती इमऍन्युअल मॅक्रों यांनीही नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर सेल्फी पोस्ट केली. ‘भारतात जगभरातील सर्वांत मोठी निवडणूक पार पडली. प्रिय मित्र नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. आम्ही एकत्रपणे भारत आणि फ्रान्स यांना एकजूट करणाऱ्या व्यूहात्मक भागीदारीला अधिक मजबूत करू,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
चीनकडूनही पंतप्रधानांचे अभिनंदन
भारतातील निवडणुकीत भाजप तसेच एनडीएच्या विजयासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
आज शिवाजी राजा झाला…! रायगड ऐतिहासिक सोहळ्यासाठी सुसज्ज
मुस्लिम महिलांनी मतं तर दिली, आता ‘गॅरंटी कार्ड’ घेण्यासाठी काँग्रेस कार्यालयाबाहेर रांगा
‘जिंकलो आम्ही अन उड्या मारत आहेत दुसरे’
हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लिम मतांमुळे निवडून आले!
इस्राइल-यूक्रेनकडूनही ‘बधाई हो’
युद्धग्रस्त इस्रायल-युक्रेनकडूनही मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्यांदा विजय मिळवणाऱ्या पंतप्रधानांचे अभिनंदन केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भारत-इस्रायलचे संबंध नव्या उंचीवर जातील, बधाई हो,’ अशा शब्दांत त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या.
तर, युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमिर येलेन्स्की यांनीही मोदी यांचे अभिनंदन केले. ‘जगभरातील सर्वांत मोठ्या अशा लोकतांत्रिक निवडणुकीच्या सफल आयोजनाचे मी स्वागत करतो. भारताच्या संसदीय निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि एनडीएचा विजय झाला आहे. सर्वांचे अभिनंदन,’ अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.