आयसीसी टी २० विश्वचषक २०२४मधील पहिल्याच सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने पापुआ न्यू गिनीला पाच विकेटने मात दिली. वेस्ट इंडिजच्या यजमानपदाखाली टी २०चा हा पहिला सामना होता. हा सामना गुयानातील पोव्हिडन्स क्रिकेट स्टेडिअमवर खेळवला गेला. सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमॅन पॉवेल याने पीएनजीविरुद्ध नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पीएनजीने पहिल्यांदा फलंदाजी करून २० षटकांत आठ विकेट गमावून केवळ १३६ धावाच करू शकली. मात्र गुयानाच्या या मंद खेळपट्टीवर ही धावसंख्या गाठतानाही वेस्ट इंडिजची दमछाक झाली. त्यांनी १९ षटकांत पाच विकेट गमावून कसाबसा विजय मिळवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना १०० धावांतच वेस्ट इंडिज संघाने पाच विकेट गमावल्या होत्या. मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आंद्रे रसेलने आल्या आल्याच मोठे शॉट लगावून संघाची पकड भक्कम केली. रसेलने नऊ चेंडूंत १५ धावा केल्या. यासह रोस्टन चेसने ४२ धावांची महत्त्वाची खेळी केली. रोस्टन चेसने २७चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकार लगावले. याशिवाय, ब्रेंडन किंग याने २९ चेंडूंत ३४ धावा केल्या. तर, निकोलस पूरन याने २७ आणि कर्णधार रोव्हमॅन पॉवेल याने १५ धावांचे योगदान दिले. रोस्टन चेसला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
हे ही वाचा:
एग्झिट पोलनंतर आता मतमोजणीवर लक्ष
मालदीवने दाखवली पॅलेस्टाइनप्रति एकजूटता
उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषद भोवणार, कारवाईचे आदेश
राममंदिराच्या पुजाऱ्याने पंतप्रधान मोदींबाबत सांगितले मोठे भविष्य!
स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा वेस्ट इंडिजचा संघ पीएनजीच्या विरुद्ध फिरकीपटूंसमोर हतबल दिसला. पीएनजीकडून सर्वाधिक धावा कर्णधार असद वाला याने केल्या. त्याने चार षटकांत २८ धावा करून दोन विकेट घेतल्या. तर, एली नाओ, चॅड सोपर आणि जॉन कारिको यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या. केवळ १३६ धावांचे लक्ष्य गाठण्यापासून रोखण्याकरिता उतरलेल्या पीएनजीच्या संघाने ज्या प्रकारे गोलंदाजीतून वेस्ट इंडिज संघाला हादरवले, ते कौतुकास्पद होते.
वेस्ट इंडिजकडून गोलंदाज रसेल आणि जोसेफची कमाल
आंद्रे रसेलने तीन षटकांत केवळ १९ धावा देऊन दोन विकेट पटकावल्या, त्याशिवाय अल्जारी जोसेफ यांनीही दोन विकेट घेतल्या. तर, अकिल होसेन, रोमारियो शफर्ड आणि मोती यांनी एकेक विकेट घेतल्या. तर, पीएनजीकडून सीस बाओ याने ५० धावांची खेळी केली. टी २० विश्वचषक स्पर्धेतील त्यांचे हे पहिले अर्धशतक होते. त्याशिवाय किपलिन डोरिगा याने २७ आणि कर्णधार असद वाला याने २१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.