अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शेख शहाजहान आणि त्याचा भाऊ आलमगीर यांच्याविरुद्ध जमीन घोटाळ्या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. शाहजहान आणि त्याच्या भावाशिवाय त्यांचा जवळचे सहकारी शिवप्रसाद हाजरा आणि दीदार बक्श मौला यांचीही नावे आरोपपत्रात जोडण्यात आली आहेत.अलीकडेच यांची सुमारे १४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.दरम्यान, शेख शाहजहानने ९० एकर जमीन बळकावून २६१ कोटी रुपये कमावले असल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चे निलंबित नेते शेख शाहजहानने संदेशखळी आणि आसपासच्या १८० बिघा जमिनीवर कब्जा करून २६१ कोटी रुपये कमावले आहेत. ११३ पानांच्या आरोपपत्रात शाहजहानचा भाऊ शेख आलमगीर आणि त्याचे सहकारी दीदार बक्श मौला आणि शिवप्रसाद हाजरा यांच्या नावाचाही समावेश आहे. या चौघांनी मिळून संदेशखळीच्या आसपासच्या जमिनी बळकावल्या आणि लोकांना धमकावणायचे काम केले आहे.
हे ही वाचा:
मिझोराममध्ये दगडी खाण कोसळून १० कामगारांचा मृत्यू
बोनेटवर बसून बीएमडब्ल्यूची सफर करणाऱ्याला अटक, चालकाचे वडीलही ताब्यात!
इस्रायलचे नेत्यानाहू म्हणतात, क्षेपणास्त्र डागली, चूक झाली!
ईडीने ५६ दिवसांत आरोपपत्र दाखल केले
सीबीआयच्या छाप्यानंतर संदेशखळी येथून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचाही उल्लेख आरोपपत्रात केला आहे. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “ईडीने या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यापासून ५६ दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जमीन हडप आणि खंडणीच्या आरोपांच्या चौकशीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. दरम्यान, ईडीने मार्चमध्ये शेख शाहजहानला अटक केली होती, त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत आहे.