चिकन-मटण आणि मासे यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी जमलेली असते.तसेच मांसाचे तुकडे खाण्यासाठी कुत्रे-मांजर देखील दुकानाबाहेर रेंगाळत असतात.ग्राहकाला त्याची ऑर्डर दिल्यानंतर खाण्यायोग्य नसलेला भाग दुकानदार कुत्रे-मांजरांपुढे टाकून देतो.परंतु, अशा भटक्या कुत्र्यांमुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.कानपूरमध्ये रविवारी (२६ मे) भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत एका मुलीला चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला आहे.या घटनेनंतर कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांनी मांस आणि माशांची अनेक दुकाने तोडण्याचे आदेश दिले.अशा दुकानांमुळे भटके कुत्रे आक्रमक झाल्याचे महापौरांनी सांगितले आहे.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाल्याचे समजताच महापौर प्रमिला पांडे पीडित कुटुंबांची भेट घटली.यावेळी संतप्त रहिवाशांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवायांचा दाखला देत, पोलिसांच्या हस्तक्षेपाच्या अभावावर टीका केली आणि निराशा व्यक्त केली.रहिवाशांची बैठक घेतल्यानंतर महापौरांनी बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
हे ही वाचा:
मिझोराममध्ये दगडी खाण कोसळून १० कामगारांचा मृत्यू
बोनेटवर बसून बीएमडब्ल्यूची सफर करणाऱ्याला अटक, चालकाचे वडीलही ताब्यात!
इस्रायलचे नेत्यानाहू म्हणतात, क्षेपणास्त्र डागली, चूक झाली!
महापौरांच्या आदेशानंतर कारवाईला सुरुवात झाली.तोडफोड सुरू असताना दुकानदारांनी विरोध दर्शवत बुलडोझर बंद करण्याची मागणी केली.परंतु, महापौरांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही आणि कारवाई सुरूच ठेवली.तब्बल ४४ दुकानांवर कारवाई करत बुलडोझर चालवण्यात आले.तसेच ही दुकाने पुन्हा सुरू केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा महापौरांनी दुकानदारांना दिला.
महानगरपालिकेच्या अहवालानुसार, कुत्र्यांच्या आक्रमक वर्तनामागील मुख्य कारण म्हणजे मांस आणि मासळीच्या दुकानातून बाहेर टाकण्यात येणारा टाकाऊ भाग, ज्याचे सेवन केल्यानंतर जनावरांना त्रास होतो.मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, दूषित मांसाचे सेवन केल्याने कुत्र्यांमध्ये आक्रमक वर्तन होते, ज्यामुळे अशा घटना घडतात.दरम्यान, भटक्या कुत्र्यांना पाणी द्यावे आणि शक्य असल्यास त्यांना पिण्यासाठी घराबाहेर पाणी ठेवावे, असे आवाहन महापालिकेने रहिवाशांना केले आहे.