भाजपच्या ओडिशा युनिटने गुरुवारी पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना बीजेडी नेते आणि जवळचे सहकारी व्हीके पांडियन यांनी ‘ओलिस’ ठेवले असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांना ओलिस ठेवले जात असल्याचे अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे, असे भाजपनेते समीर मोहंती यांनी पोलिस महासंचालक अरुण कुमार सारंगी आणि मुख्य सचिव प्रदीप कुमार जेना यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
‘बीजेडीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही व्हिडिओंवरून हे स्पष्ट होते की मुख्यमंत्र्यांना पांडियन आणि इतर बिगर ओडिया अधिकाऱ्यांनी ओलिस ठेवले आहे,’ असेही या पत्रात स्पष्ट केले आहे. पत्रात समीर मोहंती यांनी डीजीपी आणि मुख्य सचिव हे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास सक्षम आहेत की नाही, याबद्दल शंका व्यक्त केली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनीही नवीन पटनायक यांना पांडियन यांनी कैद केले आहे, असे वक्तव्य केले होते.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ‘मी राज्याचा मुख्यमंत्री आहे. मी वैयक्तिकरित्या कोणालाही भेटू शकतो आणि लोकही मला भेटू शकतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बाबतीतही असेच आहे, तथापि, ओडिशाचे मुख्यमंत्री असे करू शकत नाहीत. कोणालाही वैयक्तिकरित्या भेटू शकत नाहीत, कारण पांडियन नेहमीच त्याच्यासोबत राहतो.’
हे ही वाचा:
केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत
पुणे अपघात प्रकरण: चालकाला डांबून ठेवल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक
प. बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान टीएमसी नेत्याची हत्या
सहाव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; ५८ जागांसाठी ८८९ उमेदवार निवडणूक रिंगणात
‘मला वाटते की ओदिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश किंवा राज्यपाल यांनी नवीन बाबूंच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव नसल्याची खात्री करण्यासाठी त्यांच्याशी स्वतंत्रपणे एकट्याने बोलले पाहिजे,’ असे ते म्हणाले.
हिमंता सरमा यांच्या या दाव्याला पांडियन यांनी ओडिशातील निमापारा येथे निवडणूक प्रचारादरम्यान उत्तर दिले. ‘नवीन बाबू यांनी तुमच्या गुरूच्या गुरूंसोबत काम केले. ते पंतप्रधान वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. आसामचे मुख्यमंत्री ओडिशात पाहुणे असल्याने मी जास्त काही बोलणार नाही. परंतु मी महाप्रभू (भगवान जगन्नाथ) यांना त्यांच्यामध्ये योग्य मूल्ये रुजवण्याची प्रार्थना करेन, जेणेकरून लोकप्रिय मुख्यमंत्र्याबद्दल कसे बोलावे, हे त्यांना कळेल,’ अशी टीका पांडियन यांनी केली.