लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या प्रचाराला आता जोरदार सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी बिहार येथील मोतिहारी आणि महाराजगंज लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक रॅलीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी ‘इंडी’ आघाडी आणि इतर विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
राष्ट्रीय जनता दलाच्या पक्षाचे नाव घेता नरेंद्र मोदी म्हणाले की, “बिहारला जंगलराजच्या लोकांनी फक्त पिस्तूल, गनपावडर आणि माफिया दिले आहेत. हे लोक नोकरीच्या नावावर जमिनीची नोंदणी करून घेतात. असे लोक तरुणांचे काय भले करणार? इंडी आघाडीने आरक्षणाच्या नावाखाली खोटेपणाची मोहीम सुरू केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुम्हाला आरक्षण मिळाले नसते. काँग्रेसच्या सर्व पंतप्रधानांनी आरक्षणाला विरोध केला,” अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
“इंडी आघाडी हे घोटाळेबाजांचे वंश आहे. तीन वाईट गोष्टी त्यांच्या सर्व पक्षांमध्ये समान आहेत. हे सर्व कट्टर जातीयवादी, सांप्रदायीवादी आणि घराणेशाही जपणारे आहेत. २० लाख कोटी रुपयांचे घोटाळे करणारे इंडी आघाडीत एकत्र जाऊन बसले आहेत. हे लोक देशाचे विभाजन करू शकतात पण देशाला पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत,” अशी सडकून टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी तुम्हाला हमी देतो, मी तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत करेन, पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करेन. मला तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी विकसित बिहार, विकसित भारत बनवायचा आहे,” असा विश्वास त्यांनी जनतेला दिला. माझा कोणीही उत्तराधिकारी नाही. देशातील जनता माझे उत्तराधिकारी आहेत, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
‘जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मस्थळी सापडले पुरातन शिवमंदिर’
भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या ‘आप’ कार्यकर्त्यांवर एफआयआर!
स्वाती मालीवाल प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून एसआयटी !
७७ वर्षातील ऐतिहासिक घटना; निकोबारमधील शोम्पेन समाजाने पहिल्यांदा केलं मतदान
या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला स्पष्टपणे सांगितले की, “जनतेने उमेदवारांकडे न पाहता पंतप्रधानांना निवडून द्यावे. तुमचे मत केवळ खासदार निवडण्यासाठी नाही तर पंतप्रधान निवडण्यासाठी आहे,” असेही ते म्हणाले. इंडिया आघाडीवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील जनता पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा मला निवडून देणार हे विरोधक सहन करू शकत नाहीत. ४ जूनची तारीख जसजशी जवळ येत आहे. या लोकांकडून मला मिळणाऱ्या शिव्याही वाढत आहेत, असं नरेंद्र मोदी या सभेत म्हणाले.