कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायाधीशपदावरून सोमवारी निवृत्त झालेले न्या. चित्तरंजन दास यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होतो, अशी कबुली दिली. उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि बार सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या निरोप समारंभात ते बोलत होते. जर आरएसएस त्यांना कोणत्याही प्रकारची मदत किंवा कामासाठी बोलावत असेल आणि हे काम करण्यास जर ते सक्षम असतील तर ते संघटनेमध्ये पुन्हा परत जाण्यासाठी तयार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही लोकांना भलेही हे आवडणार नाही, मात्र मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होतो आणि राहीन हे मला येथे स्वीकार करावे लागेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
न्या. दास हे ओदिशा उच्च न्यायालयातून कोलकाता उच्च न्यायालयात बदली होऊन आले होते. त्यांनी सांगितले की, संघटनेचे माझ्यावर खूप उपकार आहेत. मी लहानपणापासून ते तरुण होईपर्यंत त्यांच्यासोबत होतो. ‘मी साहसी, प्रामाणिक होणे व दुसऱ्यांच्या प्रति समान दृष्टिकोन ठेवण्यास शिकलो. तसेच, देशभक्तीची भावना आणि कामाच्या प्रति कटिबद्धता राखण्याबाबत शिकलो. मात्र माझ्या कामाच्या स्वरूपामुळे मी ३७ वर्षे संघटनेपासून दूर होतो,’ असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
‘जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मस्थळी सापडले पुरातन शिवमंदिर’
विमानाच्या धडकेत ४० फ्लेमिंगोंचा मृत्यू
बारावीच्या निकालात मुलींची बाजी; राज्याचा एकूण निकाल ९३.३७ टक्के
लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य मतदानानंतर केंद्रावर आल्याने वाद; गोळीबारात एकाचा मृत्यू
‘सदस्यत्वाचा वापर करीअरच्या प्रगतीसाठी केला नाही’
‘मी कधीही संघटनेच्या सदस्यत्वाचा वापर करीअरमध्ये प्रगतीसाठी केला नाही. कारण हे त्याच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. मी सर्वांसोबत सारखाच वागलो. मग ती श्रीमंत व्यक्ती असो वा कम्युनिस्ट, भाजप असो वा काँग्रेस वा तृणमूल काँग्रेस,’ असेही दास यांनी स्पष्ट केले. ‘माझ्यासाठी सर्व समान आहेत. मी कोणासाठी किंवा कोणत्याही राजकीय पक्षासाठी पूर्वग्रह ठेवत नाही. मी माझ्या जीवनात काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे मी संघटनेशी जोडलेलो आहे, हे सांगण्याचे धाडस माझ्यात आहे. कारण हेही चुकीचे नाही,’ असेही ते म्हणाले.