बिहारच्या सारण लोकसभा मतदारसंघात मतदानानंतरच्या दुसऱ्या दिवशी हिंसाचार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सारण लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर हिंसाचार घडला आहे. यापूर्वी सोमवारी छपरा येथील बूधवर भाजपा आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. अशातच मंगळवारी सकाळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर गोळीबार केला, त्यात तीन जणांना गोळ्या लागल्या. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य सारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. रोहिणी आचार्य या मतदानानंतर छपरा शहरातील एका बूधवर पोहचल्या होत्या. मतदान संपल्यानंतर त्या मतदान केंद्रावर आल्याने वाद झाला होता. यातून मंगळवारी दोन्ही गटांमध्ये जोरदार गोळीबार झाला आहे. यामध्ये तीन लोक जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. बूथ क्रमांक ३१८ आणि ३१९ वर हा वाद झाला होता. जखमींना उपचारासाठी पाटणा येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर छपराच्या भिखारी ठाकूर चौकाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सारणमध्ये दोन दिवसांसाठी इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘आम्ही देऊ मुस्लिमांना आरक्षण’
पुणे पोलिसांची कारवाई; फरार बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल अटकेत
पाचव्या टप्प्यात कुणाचा सुपडा साफ होणार?
गावाचा मतदानावर बहिष्कार, राहुल गांधी पोहचतास दिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा!
प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, “दोन्ही बाजूचे अनेक लोक होते. लोक लाठ्या-काठ्या घेऊन आले होते. गोळ्याही झाडल्या. तीन जणांना गोळ्या लागल्या आहेत.” रोहिणी आचार्य यांनी बूथवर पोहोचल्यानंतर मतदारांशी गैरवर्तन केल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, त्यांचे समर्थकही त्यांच्यासोबत होते. संतप्त जमाव पाहून रोहिणी आचार्य यांना तेथून जावे लागले, मात्र मंगळवारी सकाळी हा वाद पुन्हा चिघळल्याने गोळीबार झाला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यांतर्गत सोमवारी आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ जागांवर मतदान झाले. या टप्प्यांतर्गत बिहारमधील सीतामढी, मधुबनी, मुझफ्फरपूर, सारण आणि हाजीपूर या पाच जागांवर मतदान झाले.