पुण्यात बेदरकारपणे पोर्शे गाडी चालवून दोघा तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या अल्पवयीन मुलाला त्वरित जामीन मिळाल्यानंतर मोठा गदारोळ माजला आहे. त्यामुळे या अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून कारवाई करून त्याच्या खटल्यावर त्या प्रमाणे सुनावणी करावी, अशी विनंती पोलिस न्यायालयाला करणार आहे.
हा अल्पवयीन मुलगा पुण्यातील मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आहे. त्याला चार महिन्यांनी १८ वर्षे पूर्ण होणार आहेत. अल्पवयीन प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या न्यायालयाने त्याला अवघ्या काही तासांत जामीन मंजूर करताना त्याला अपघातावर निबंध लिहिण्याची, दारू सोडण्यासाठी मदत घेण्याची आणि पुणे वाहतूक पोलिसांना स्वयंसेवक म्हणून मदत करावी, असे आदेश दिले होते. मात्र त्याला जामीन मिळाल्यानंतर संपूर्ण शहरवासींकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.
‘रविवारीच आम्ही बाल न्याय न्यायालयासमोर एक अर्ज दाखल केला होता, ज्यात किशोरवयीन मुलावर प्रौढ म्हणून कारवाई करावी आणि गुन्हा क्रूर असल्याने त्याला निरीक्षणगृहात पाठवावे, यासाठी परवानगी मागितली होती. परंतु याचिका फेटाळण्यात आली होती. आम्ही आता याच याचिकेसह सत्र न्यायालयात जात आहोत,’ असे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. त्यांचा जामीन रद्द करण्याची विनंतीही ते न्यायालयाला करणार आहेत.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीचालक हा अल्पवयीन जरी असला तरी घडलेला अपघात हा क्रूर गुन्ह्याचा प्रकार असल्याचे सांगत या कारचालकावर सज्ञान म्हणून कारवाई करा, अशी स्पष्ट सूचना यांनी सोमवारी पुणे पोलिसांना दिली होती. त्यानंतर तातडीने पोलिसांकडून पावले उचलण्यात आली. त्यानंतर ‘या प्रकरणात सुरुवातीला लावलेले ‘३०४ अ’ हे कलम बदलून ‘३०४’ हे कठोर कलम लावले आहे. पोलिसांनी किरकोळ कारवाई केली, असा कोणीही समज करून घेऊ नये,’ असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
अल्पवयीन आरोपीने शनिवारी रात्री त्याचा १२वीचा निकाल साजरा करण्यासाठी १२ मित्रांसोबत पार्टी केली होती. त्या वेळी या सर्वांनी मुंढवा येथील कोजी रेस्टॉरंटमध्ये मद्यप्राशन करून जेवण घेतले. तिथे त्यांनी होगार्डन, जॉनी वॉकर, ब्लॅक लेबल आमि अबसोल्युट ब्लू हे मद्य मागवले होते. त्यानंतर मध्यरात्री हे सर्व ब्लॅक क्लब येथे गेले. तिथे त्यांनी पुन्हा मद्यप्राशन करून पहाटे एक वाजता ते रेस्टॉरंटच्या बाहेर पडले. रविवारी सकाळी ११ वाजता घेण्यात आलेल्या ब्रेथॅलिझर चाचणीत मद्याचे अंश सापडले नसले तरी पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
हे ही वाचा:
‘आम्ही देऊ मुस्लिमांना आरक्षण’
पुणे पोलिसांची कारवाई; फरार बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल अटकेत
पाचव्या टप्प्यात कुणाचा सुपडा साफ होणार?
गावाचा मतदानावर बहिष्कार, राहुल गांधी पोहचतास दिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा!
अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कोझी रेस्टॉरंटचे मालक प्रल्हाद भुटाडा व ब्लॅक क्लबचे संदीप सांगळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, अल्पवयीन मुलाच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी मार्च महिन्यात सिल्व्हर ग्रे रंगाची पोर्शे गाडी विकत घेतली होती. मात्र त्याची नोंदणी केली नव्हती. तसेच, त्याने गाडीवरचा ४४ लाखांचा रस्ते करही भरला नव्हता. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्याकडे वाहन परवानाही नव्हता. सीसीटीव्ही फुटेजनुसार, अल्पवयीन आरोपी अपघातावेळी सुमारे १६० प्रति किमी वेगाने गाडी चालवत होता, असा पोलिसांचा अंदाज आहे.