मुंबई-ठाण्यासह पालघर, कल्याण, भिवंडी, नाशिक, धुळे, दींडोरी लोकसभेच्या १३ जागांवर उद्या मतदान होणार आहे. निवडणुकीचा एकूण रागरंग पाहाता, मतदानाच्या पाचव्या टप्प्यात उबाठा शिवसेनेसह मविआचा सुपडा साफ होणार असे चित्र दिसते आहे.
यंदाच्या निवडणुकीत प्रचार सभा, सोशल मीडियाचा वापर हे घटक पाहिले तर महायुती आणि मविआ यांच्यात फार मोठा फरक दिसत नाही. जनतेवर प्रभाव टाकू शकतील अशा प्रमुख दहा मुद्द्यांचा विचार केला तर महायुतीचे पारडे या निवडणुकीत जड दिसते. मुंबई ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. हा बालेकिल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ही बाब उद्या स्पष्ट होणार आहे. पाचव्या टप्प्यात महायुती बाजी मारेल अशी दाट शक्यता आहे.
पंतप्रधान पदाचा उमेदवार, गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रासह देशभरात झालेली विकास कार्य. त्यामध्ये मुंबई पुरता विचार केला तर कोस्टल रोड, मेट्रोचे जाळे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सि-लिंकचा विस्तार, बुलेट ट्रेन, नवी मुंबई विमानतळ आदी प्रकल्पांना गती आलेली आहे. मविआच्या काळात उद्धव ठाकरे यांनी याप्रकल्पात खोडा घालण्याचा प्रय़त्न केला होता. देशात मोदी यांचे सरकार येण्यापूर्वी मुंबईला वारंवार लक्ष्य करण्याचा प्रय़त्न करण्यात आला. परंतु गेल्या दहा वर्षात मुंबईसह देशभरात घातपाताची एकही घटना घडलेली नाही.
कोरोनाच्या काळात मोदींनी गोरगरीबांना मोफत लस पुरवून लोकांचे जीव वाचवले. एका बाजूला मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हवर दर्शन देत असताना विरोधी पक्षनेते पदी असताना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होते. कोविडच्या काळात ठाकरे सरकारशी संबंधित लोकांनी केलेले विविध घोटाळे लोक विसरलेले नाहीत.
शिवसेना फुटल्यामुळे लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरे यांना मिळेल असा दावा केला जातो. पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष चोरला, बाप चोरला, चिन्ह चोरले अशा प्रकारचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व कोणीही चोरले नसताना उद्धव ठाकरे यांनी का सोडले. काँग्रेसशी युती का केली. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ते का गेले नाहीत. भगव्या ध्वजाचा उल्लेख त्यांनी फडके असा का केला, हे प्रश्न लोकांच्या मनात आहेत.
उद्धव ठाकरे मुस्लीम मतांसाठी आटापिटा करतायत ही बाब त्यांनीही लपवून ठेवलेली नाही. दक्षिण मुंबईत मुस्लीमांची मतं अरविंद सावंत यांना मिळणार अशा प्रकारच्या बातम्या सामनामध्ये छापून येतात. हिंदूंची मतं मिळणार काय, याबाबत त्यांना फार चिंता दिसत नाही. ठाकरेंच्या सभेत हिरवे झेंडे नाचवले जातायत. हे हिरवे झेंडे पाकिस्तानचे झेंडे नाहीत, हे मुस्लीमांचे झेंडे आहेत, असे खुलासे ठाकरेंच्या पक्षाचे लोक करतायत. परंतु मग भगवे झेंडे गेले कुठे? हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. ठाकरे यांच्या पक्षात झालेला हा बदल इतका ठसठशीत आहे बाळासाहेबांचे विचार मानणारा शिवसैनिक या मुद्द्यावर तर उद्धव ठाकरेंच्या नक्कीच विरोधात जाणार.
दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईच्या जागा महायुतीसाठी जड आहेत, असे मानले जाते. दक्षिण मुंबईत बऱ्यापैकी असलेले मुस्लीम मतदान हा घटक सावंत यांच्या पथ्यावर पडेल, असे सांगितले जाते. परंतु त्यांच्या विरोधात लढणाऱ्या शिवसेनेच्या यामिनी जाधव या भायखळ्यासारख्या मतदार संघातून जिंकून आल्या आहेत. ज्या मतदार संघात मुस्लीमांचा टक्का मोठा आहे.
हे ही वाचा:
अहमदाबाद विमानतळावर इसिसशी संबंधित श्रीलंकन नागरिकांच्या मुसक्या आवळल्या
‘आप’ला २०१४ ते २०२२ या काळात ७.०८ कोटींचा परदेशी निधी
भारत इराणच्या पाठीशी, राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त!
उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि उबाठा सेनेचे अमोल कीर्तिकर अशी लढत आहे. रवींद्र वायकर हे तीन वेळा जोगेश्वरी विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्या आधी ते नगरसेवक होते. अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पूर्वमध्ये भाजपाची ताकद आहे. गोरेगाव आणि मालाडमध्ये खासदार म्हणून गजानन कीर्तिकर यांचे काम आहे, ते निवडणूक प्रचारात सक्रीय दिसत नाहीत. त्यांची पुण्याई कोणाच्या पारड्यात पडते आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. दिंडोशीमध्ये उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांचे काम आहे. इथे काही प्रमाणात अमोल कीर्तिकर यांना मतं पडण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांच्यावर ईडीची कारवाई सुरू होती, हे सत्य जरी असले तर अमोल कीर्तिकर यांच्यावरही खिचडी घोटाळ्याचे बालंट आहेच.
ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे नरेश मस्के आणि उबाठाचे राजन विचारे यांच्यात लढत आहे. नवी मुंबईत ताकद असलेले संजीव नाईक इथून इच्छुक होते. त्यांना तिकीट मिळाले नसल्यामुळे गणेश नाईकांची नाराजी मस्के यांना भोवण्याची शक्यता आहे, अशी चर्चा होती. परंतु या वावड्या ठरल्या नाईक कुटुंबीय इथे ताकदीने प्रचार करताना दिसतायत. ठाणे मतदार संघात एकनाथ शिंदे यांचा वैयक्तिक संपर्क आहेच, शिवाय इथे मीरा भाईंदर मध्ये भाजपाच्या बंडखोर असलेल्या गीता जैन विजयी झाल्या होत्या. ऐरोली आणि बेलापूरमधून संजीव नाईक आणि मंदा म्हात्रे आमदार आहेत. ठाण्यातून संजय केळकर आहेत. माजिवाड्यातून प्रताप सरनाईक, पाचपाखडीतून एकनाथ शिंदे असे आमदारांचे बळ आहे. याचा अर्थ भाजपाच्या बंडखोर गीता जैन आणि भाजपाचे तीन आमदार तसेच शिवसेनेचे दोन आमदार अशी परिस्थिती असल्यामुळे मस्के यांच्यासाठी निवडणूक जड नाही.
भिवंडी, धुळे, दिंडोरी इथे भाजपाचे तर कल्याण आणि पालघर खासदार आहेत. नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिलेली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)