देशभरात पाचव्या टप्प्यातील मतदानाचा उत्साह दिसून येत असताना महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या सर्व टप्प्यांमध्ये सर्वाधिक १३ मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सर्व सहा मतदारसंघांसह भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर या मतदारसंघांमध्येही महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार आमने-सामने आले आहेत. यात अनेक दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पाचव्या टप्प्यातील मतदानावर लक्ष असणार आहे. सकाळपासूनच मतदानासाठी केंद्रांवर रांगा दिसून येत आहेत.
मुंबईतील सर्व जागांसाठीचे मतदान पार पडत असून अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. बॉलीवूड कलाकार, मराठी अभिनय क्षेत्रातील कलाकार, राजकीय नेत्यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावून नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. ठाणे येथे त्यांनी त्यांचे वडील, पत्नी, मुलगा श्रीकांत शिंदे, त्यांची सून यांच्यासह मतदान केले. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्रात महायुतीच्या ४५ जागा निवडून येतील. विरोधकांचा सुपडा साफ होईल. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला धडा शिकवला, त्याच बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी काँग्रेसला अभिमानाने मतदान केलं आहे. हा शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीतला काळा दिवस आहे,” अशी एकनाथ शिंदे यांनी तिखट शब्दात टीका केली आहे.
हे ही वाचा:
बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार; तारीख ठरली
उपचारांसाठी भारतात आलेले बांगलादेशचे खासदार बेपत्ता
संसदेची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे!
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरांतून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डर जप्त!
राज्यात पाचव्या टप्प्यात साधारण दोन कोटी ४६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून ते २६४ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील. त्याशिवाय, राष्ट्रीय पातळीवरही तब्बल आठ राज्यांमधील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. यात अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.