“सत्ता असताना १०० वेळा घटनेत दुरुस्त्या करणाऱ्या काँग्रेसला संविधान धोक्यात असल्याचा साक्षात्कार होत आहे. गरीबी हटाव चे आश्वासन अनेक वर्षे सत्ता भोगूनही पूर्ण न करणाऱ्या काँग्रेसला आजही पुन्हा तेच आश्वासन द्यावे लागत आहे. मात्र देशाचा मतदार काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडणार नाही,” असा विश्वास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शनिवारी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मोहन यादव बोलत होते.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी नकली शिवसेनेच्या प्रचारात सहभागी झाल्याचे पाहून बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना होत असतील, अशा तिखट शब्दांत मोहन यादव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.
मोहन यादव म्हणाले की, बहुमताच्या बळावर मागच्या १० वर्षांत भाजपा-एनडीए सरकारने वेगाने देशाचा विकास आणि देशहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांमुळे आमच्यावर टीका करता येत नसल्याने विरोधक अपप्रचार करत फिरत आहेत. भाजपा-एनडीए ने ४०० जागांवर विजय मिळवला तर देशाचे संविधान धोक्यात येईल, असा आरोप करताना काँग्रेसला त्यांनीच तब्बल १०० वेळा संविधान बदल केल्याचा सोयीस्कररित्या विसर पडतो. १९५० मध्ये संविधान लागू झाल्यापासून पं. नेहरूंच्या राजवटीत ११ वेळा, इंदिरा गांधींनी १७ वेळा तर राजीव गांधींच्या राजवटीतच १० वेळा संविधानात बदल केले गेले होते, याची मोहन यादव यांनी आठवण करून दिली. आणीबाणी लागू करून संविधान, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम काँग्रेसनेच केले असे सांगून ते म्हणाले की संविधान बदलाच्या काँग्रेसच्या खोट्या अपप्रचारावर मतदार विश्वास ठेवणार नाहीत.
अनेक दाखले देत मोहन यादव यांनी एनडीए, महायुती आणि युपीए, मविआ सरकार या दोहोंमधला फरक दाखवून दिला. एकीकडे सागरी सेतू, मेट्रो, पूल, रस्ते बांधणारे, कलम ३७० हटवून जम्मू काश्मीरच्या जनतेला न्याय देणारे, ट्रिपल तलाक प्रथा बंद करून मुस्लीम महिलांचा सन्मान राखणारे, जातपात न पाहता सर्वांसाठी गरीब कल्याणाच्या योजना राबवणारे भाजपा-एनडीए, महायुती सरकार आहे. तर, दुसरीकडे सदैव विकासकामात खोडा घालणारे, मुंबईची मेट्रो रोखणारे आणि संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून अपप्रचार करणारे मविआ आणि युपीए सरकार आहे. विरोधक समजतात तशी जनता दुधखुळी नाही. मतदानाच्या पाचव्या टप्प्यात विकसित भारतासाठी भाजपा-एनडीए आणि महायुतीच्या उमेदवारांना मत देऊन मतदार विरोधकांना धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारधारेला तिलांजली देत नकली शिवसेना हिंदूत्वविरोधी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसली आहे अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत ते म्हणाले की, नकली शिवसेनेचे इतके अधःपतन झाले आहे की व्होटबँकेचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसच्या रांगेत ते जाऊन बसले आहेत. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इब्राहिम मुसाला उबाठा सेनेच्या प्रचारात उतरवून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांचे समर्थन नकली शिवसेना करत आहे. हा मुंबईकरांचा घोर अपमान आहे. इंग्रज गेले पण काँग्रेसला सोडून गेले, अशा शब्दात मोहन यादव यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला.
हे ही वाचा :
किर्गिस्तानमधील हिंसाचारात भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थी लक्ष्य
‘आप’मधील वातावरण ‘गैरवर्तन’, ‘गुंडगिरी’चे असून ‘ब्लॅकमेल संस्कृती’ने काम सुरू
निकालाला विलंब होऊ नये म्हणून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ब्राझीलवरून परतताना विमानात तयार केला मसुदा
केवळ दोषारोप करणे आणि जात-धर्माच्या नावावर विभाजन करणे हा काँग्रेसचा एकमेव अजेंडा आहे. इंग्रजांची फूट पाडा आणि राज्य करा हीच नीती काँग्रेसची असल्याची टीका मोहन यादव यांनी केली. या ना त्या प्रकारे समाजात फूट पाडण्याचे उद्योग काँग्रेस आणि घमंडीया आघाडी करत असल्याचेही ते म्हणाले. मागील १० वर्षात भाजपा-एनडीए सरकारच्या कामाचे प्रगतीपुस्तक सर्वांसमोर खुले आहे. २५ कोटी जनतेला गरीबीतून बाहेर काढले, मोफत धान्य, वीज, पाणी, गॅस जोडणी, आयुष्मान योजनेचा लाभ मिळवून दिला. देशाची जागतिक स्तरावर प्रतिमा उजळवत देशाला बलशाली बनवले. मोदी सरकारने भारतीय सांस्कृतिक स्थळांचा जीर्णोद्धार आणि मंदिरांची पुनर्बांधणी केली आहे. मोदी सरकारमुळेच अयोध्येत रामलल्ला मंदिरात विराजमान झाले आता जनतेच्या नजरा मथुरेतील गोपाळकृष्णाकडे लागल्या आहेत हे आम्ही जाणून आहोत असे ते म्हणाले. तिस-यांदा मोदी सरकारला सत्तेत आणण्यासाठी आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले.