लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि विरोधक यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
नरेंद्र मोदी म्हणाले की, “जर सपा आणि काँग्रेस सत्तेवर आले तर, रामलल्ला पुन्हा तंबूत जाणार. ते राम मंदिरावर बुलडोझर चालवतील. खरे तर, बुलडोझर कुठे चालवायला हवे आणि कुठे नाही, यासंदर्भात त्यांनी योगीजींकडून ट्यूशन घ्यायला हवी. सपाच्या एका वरिष्ठ नेत्याने रामनवमीच्या दिवशी सांगितले की, राम मंदिर निरुपयोगी आहे. काँग्रेस राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्यासाठी फक्त त्यांचे कुटुंब आणि सत्ता महत्त्वाची आहे.” अशी घाणाघाती टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “त्यांना ममता बॅनर्जी यांच्या रुपात नव्या आत्या मिळाल्या आहेत. या नव्या आत्या बंगालमध्ये आहेत. या आत्यांनी इंडी आघाडीला सांगितले आहे की, मी आपल्याला समर्थन करेल, पण बाहेरून,” असा खोचक टोला नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव यांना लगावला आहे. मोदी सरकारची ‘हॅट्रिक’ होत असल्याचे संपूर्ण देश आणि जगाला माहित आहे. नव्या सरकारमध्ये गरीब, तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठे निर्णय घ्यायचे आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“सपा-काँग्रेससाठी त्यांच्या व्होटबँकेपेक्षा मोठे काहीही नाही. जेव्हा त्यांचा पर्दाफाश करतो, तेव्हा ते अस्वस्थ होतात, त्यांना रात्री निद्रानाश होतो. ते काहीही बोलू लागतात, शिव्या घालू लागतात. संविधान बनवताना धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचे नाही असा निर्णय संविधान सभेने घेतला होता. पण, १० वर्षांपूर्वी या लोकांनी (काँग्रेस) धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी कर्नाटकातही हे केले आहे. तिथे त्यांनी रातोरात सर्व मुस्लिमांना ओबीसी बनवले. तेथील ओबीसींना दिलेल्या आरक्षणाचा मोठा हिस्सा त्यांनी लुटला,” अशी सडकून टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
हे ही वाचा:
टी-२० वर्ल्डकप भारत-पाक सामन्यांचे तिकीट २ लाखात!
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी पैसे मागितले!
ममता म्हणतात, ‘तृणमूल इंडी आघाडीचा भाग’, पण काँग्रेसला विश्वास नाही!
अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना लष्करी गणवेश, वाद वाढताच महापालिकेचा यू-टर्न!
यावेळी त्यांनी नाव न घेता लालू प्रसाद यादव यांनाही खडेबोल सुनावले आहेत. “चारा घोटाळ्यातील बिहारचा चॅम्पियन जे सध्या प्रकृतीच्या बहाण्याने तुरुंगाबाहेर फिरत आहेत. मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायला हवं असंही ते म्हणत आहेत. म्हणजे दलित, आदिवासी, मागासलेल्यांना काहीही मिळणार नाही. सपा-काँग्रेसने तुष्टीकरणापुढे शरणागती पत्करली आहे आणि जेव्हा मोदी देशाला त्यांचे सत्य सांगतात तेव्हा ते म्हणतात की मोदी हिंदू आणि मुस्लीम करत आहेत. ज्या व्होटबँकेमागे हे लोक धावतात त्यांनाही त्यांचे सत्य समजू लागले आहे. तिहेरी तलाक कायद्याने खूश असलेल्या आमच्या माता-भगिनी भाजपला सतत आशीर्वाद देत आहेत,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी या सभेतून केली.