केरळमधील कोझिकोड मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी एका मुलीच्या बोटाऐवजी चुकून तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होत असून या डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे.मुलीचे सहावे बोट काढण्यासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यानंतर तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया झाल्याचे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला.
मुलीच्या तोंडात गळू असल्याचे निदान झाल्याने तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया केल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मात्र तिच्या जिभेमध्ये कोणतीच समस्या नव्हती, असे सांगत मुलीच्या कुटुंबांनी डॉक्टरांचा दावा खोडून काढला. त्यानंतर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी चूक झाल्याचे कुटुंबांना कळवले. दोन मुलांच्या एकाच तारखेला शस्त्रक्रिया होणार होत्या, त्या गोंधळातून हा प्रकार झाल्याचे या अधिकाऱ्यांनी कुटुंबाला सांगितले, अशी माहिती कुटुंबातील एका सूत्रांनी दिली. ही घटना उघड होताच राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवर संघर्ष उफाळला; डूरंड लाईनवर तालिबान्यांचा हल्ला
“अप्रामाणिकपणा केला असेल तर फाशी द्या”
होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेला पकडले
नांदेडमध्ये प्रसादातून ९० जणांना विषबाधा!
वैद्यकीय शिक्षण संचालकांकडून अहवाल मिळाल्यानंतर आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी डॉ. बिजोन जॉन्सन यांना निलंबित केले. आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयांना शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय प्रक्रिया प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याच्या कठोर सूचना दिल्या आहेत.
आयपीसी कलम ३३६ (इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणे) आणि ३३७ (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या कृत्यामुळे दुखापत होणे) या कलमांच्या आधारे मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून डॉक्टरांविरुद्ध पोलिस केस दाखल करण्यात आली. विरोधी पक्षनेते व्हीडी साठेसन यांनीही या घटनेचा निषेध करून राज्यातील वैद्यकीय सेवांच्या घसरत्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.