सरकार आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांचं व्हिजन तयार असल्याचा विश्वास नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला. शिवाय या व्हिजनमध्ये आपण २५ दिवस आणखी वाढवणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. माझ्या देशातील नव मतदारांनी मला त्यांच्या मनातील गोष्टी सांगाव्यात. सल्ले द्यावेत. त्या गोष्टींवर काम करून त्यातील निवडक गोष्टींचास पुढील २५ दिवसांमध्ये समावेश करणार आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच त्यांनी यासाठी त्यांचे सल्ले लिहून देण्याचे आवाहन देशातील तरुण पिढीला केले आहे.
“काँग्रेस कधीही विकासाची गोष्ट करू शकत नाही”
“काँग्रेस कधीही विकासाची गोष्ट करू शकत नाही. त्यांना केवळ हिंदू-मुसलमान करणं माहिती आहे. त्यांच्यासाठी विकासाचा अर्थ म्हणजे जे त्यांना मत देतात त्यांचाचं विकास,” अशी घाणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर आणि काँग्रेसवर केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी बुधवारी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याणमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी इंडी आघाडी, काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
“काँग्रेसला केवळ हिंदू-मुसलमान करणं इतकच माहित आहे. काँग्रेस कशाप्रकारे हिंदू-मुसलमान करते याचा खुलासा केला, त्यांची बेईमानी बाहेर आणली की त्यांची इको सिस्टीम ओरडायला लागते. ते म्हणतात, नरेंद्र मोदी हिंदू-मुसलमान वाद आणतात. पण, त्यांना कळत नाही की, मोदी हिंदू-मुसलमान यांच्या नावाने देशाला तोडणाऱ्यांचा खुलासा करत आहे,” असा शाब्दिक हल्ला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला.
“माझ्या छवीपेक्षा हिंदुस्थानची एकता महत्त्वाची”
“आजही काँग्रेस आणि इंडिया आघाडी तृष्टीकरणाचा खेळ खेळत आहेत. त्यांचं लक्ष एसटी, एससी आणि ओबीसीच्या आरक्षणावर आहे. त्यासाठी त्यांनी प्रयोग सुरु केला आहे. कर्नाटकात त्यांनी त्याची लॅबोरेटरी बनवली आहे. कर्नाटकात जितके मुसलमान होते, त्यांनी रातोरात हुकूम काढला की, सर्व मुसलमान ओबीसी आहेत. ओबीसींच्या कोट्यातील खूप मोठी लूट केली. आरक्षणाची हीच लूट काँग्रेस संपूर्ण देशात करु इच्छित आहे,” असा दावा नरेंद्र मोदींनी भाषणात केला. इंडिया आघाडीच्या एका तरी नेत्याने याला विरोध केला आहे का? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. माझ्या छवीपेक्षा हिंदुस्थानची एकता महत्त्वाची असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. काँग्रेस त्यांच्या सरकारच्या काळात उघडपणे म्हणत होती की, देशाच्या संसाधनांवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. हे डॉ. मनमोहन सिंह यांनी सांगितलं होतं आणि आपण उपस्थित होतो आणि या वक्तव्याचा विरोध केला होता, असं नरेंद्र मोदी यांनी केला.
“काँग्रेसने १५ टक्के बजेट मुस्लिमांसाठी वेगळं करण्याचा घाट घातलेला”
“विकासाच्या बजेटमध्येही काँग्रेसने भिंत घातली होती. हिंदू बजेट आणि मुस्लिम बजेट. १५ टक्के बजेट मुस्लिमांसाठी वेगळं करण्याचा घाट त्यांनी घातला होता. त्यांना धर्माच्या नावावर देश बनवायचा होता, तो त्यांनी बनवला. तुम्ही सांगा असं होऊ शकतं का? हिंदूंसाठी इतकं, मुस्लिमांसाठी एवढं. हे पाप काँग्रेस करत होतं,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
उबाठाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे कसे काय?
राहुल गांधी यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ!
‘वीर सावरकरांची निंदा करणाऱ्यांना नकली शिवसेनेकडून डोक्यावर घेऊन नाचण्याचे काम’
घाटकोपरमधील होर्डिग प्रकरण: भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात
“जनतेने ठरवलंय फिर एक बार मोदी सरकार”
“पूर्वी काँग्रेस निवडणुकांमध्ये काँग्रेसचे लोक गरीबीचा जप करत होते, त्यांनी भ्रष्टाचाराचा शिष्टाचार केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धरतीवरुन मी तुम्हाला विचारतो, असे लोक देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात का? तुमचे स्वप्न पूर्ण करु शकतात का? तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करु शकतात का? त्यांच्या सरकारने विकासाला ब्रेक लावला होता. आमच्या सरकराने ब्रेक काढून गाडी टॉप गिअरमध्ये आणली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे विश्वास आणि उत्साह आहे. आता जनतेने ठरवलं आहे की फिर एक बार मोदी सरकार,” असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.