‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंस्थेवर चिनी फंडिंगचे आरोप करण्यात आले होते. संबंधित वृत्तसंस्थेला काम करण्यासाठी चीनकडून निधी मिळत असल्याचा आरोप केला जात असताना याप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘न्यूज क्लिक’चे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर युपीए अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी युपीए अंतर्गत केलेल्या कारवाईला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर निकाल देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर बुधवार, १५ मे रोजी ‘न्यूज क्लिक’चे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिले. ‘न्यूज क्लिक’च्या संस्थापकाची अटक आणि त्यानंतर त्यांना झालेली कोठडी बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी वेळी म्हटले आहे. रिमांडपूर्वी अटकेचे कारण त्यांना किंवा त्यांच्या वकिलांना सांगितले नव्हते, असेही निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंस्थेने चीनकडून बेकायदा निधी घेतल्याचा आरोप आहे. तसेच चिनी प्रचारासाठी ‘न्यूज क्लिक’ला कोट्यवधी रुपयांचा विदेशी निधी मिळाल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला होता. हा निधी अमेरिकेच्या मार्गाने पुरवण्यात आल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं होतं.
हे ही वाचा:
दिल्लीच्या विजयामुळे राजस्थान प्लेऑफमध्ये!
संकुचित दृष्टिकोन नको, भारताने अमेरिकेला सुनावले
लिफ्टची साखळी तुटून कोलिहान खाणीत अडकलेल्या १४ जणांना वाचवले
‘न्यू यॉर्क टाईम्स’मधील एका अहवालामध्ये अमेरिकास्थित उद्योजक नेव्हिल रॉय सिंघम याने ‘न्यूज क्लिक’या संस्थेला आर्थिक मदत केली. तसेच त्याचा संबंध चिनी कम्युनिस्ट पक्षाशी असल्याचा आरोप केला आहे. तसेच, नेव्हिल रॉय सिंघमच्या नेटवर्कने चुकीच्या माहितीला प्रोत्साहन दिलं आणि चीन समर्थक संदेशांचा प्रचार करून मुख्य प्रवाहातील काही प्रकरणांवर प्रभाव टाकला, असं म्हणण्यात आले होते.