इराण आणि भारत यांच्यात इराणमधील चाबहार बंदर संचालन करण्यासाठीचा दहा वर्षांचा हा करार झाला आहे. यामुळे भारताचा मध्य आशियाशी व्यापार वाढविण्यास मदत होणार आहे. मात्र, अमेरिकेला भारताने केलेला हा करार फारसा पटलेला नसून त्यासंबंधीचे वक्तव्य समोर आले आहे. शिवाय भारताच्या या निर्णयानंतर अमेरिकेने भारताला इशाराही दिला आहे. यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही सडेतोड उत्तर देत भारताची बाजू मांडली आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की, चाबहार बंदर चालविण्यासाठी भारताने इराणशी केलेल्या करारामुळे संपूर्ण क्षेत्राला फायदा होणार आहे आणि लोकांनी त्याकडे संकुचित दृष्टिकोन ठेवून पाहू नये. “जे लोक इराणशी व्यापार करतील त्यांना निर्बंधासारख्या धोक्यांना तोंड द्यावे लागू शकते. इराणशी व्यापारी संबंध निर्माण करताना याची माहिती असणे इतर देशांसाठी आवश्यक आहे,” असं वक्तव्य अमेरिकेकडून आले होते. यानंतर एस जयशंकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
कोलकाता येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना जयशंकर म्हणाले की, “हा संवाद साधण्याचा, पटवून देण्याचा आणि लोकांना समजून घेण्याचा प्रश्न आहे, हा करार सर्वांच्या फायद्याचे आहे. लोकांनी त्याकडे बघताना संकुचित दृष्टिकोन बाळगू नये,” असं जयशंकर म्हणाले. तसेच एस जयशंकर म्हणाले की, यापूर्वी अमेरिकेने स्वतः चाबहार बंदराच्या मोठ्या प्रासंगिकतेचे कौतुक केले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे पैसे कुठे गुंतवतात?
‘स्वाती मालीवाल हिच्या जीवाला धोका’
दिल्ली: प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याचा २०० वेळा विमान प्रवास!
लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिदनी २०२१मध्ये दिली होती होर्डिंगला परवानगी
अमेरिका स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते वेदांत पटेल यांना पत्रकार परिषदेत या करारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, “इराण आणि भारत यांच्यात झालेल्या चाबहार बंदराच्या कराराची माहिती मिळाली आहे. चाबहार बंदराचा करार आणि इराणशी द्वीपक्षीय संबंध याबाबत भारतानेच आपले परराष्ट्र धोरण जाहीर करावे. अमेरिकेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आम्ही इराणवर निर्बंध घातले आहेत आणि त्यावर यापुढेही ठाम राहू. जे लोक इराणशी व्यापार करतील त्यांना निर्बंधासारख्या धोक्यांना तोंड द्यावे लागू शकते. इराणशी व्यापारी संबंध निर्माण करताना याची माहिती असणे इतर देशांसाठी आवश्यक आहे,” असा इशाराच त्यांनी एक प्रकारे बोलून दाखविला आहे.