देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून राजकीय नेत्यांमध्ये आरोप्र- प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे. निवडणुकीचे चार टप्पे यशस्वी पार पडले असून आता पाचव्या टप्प्याच्या प्रचाराची सुरुवात झाली आहे. मुंबईतील सर्व जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान सुरू होणार आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटावर कल्याणच्या जागेवरून निशाणा साधला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांचा उमेदवार कल्याणमध्ये लढणार आहे की नूरा कुस्तीचा आहे एवढे सांगावं. या दोघांमध्ये समझोता झाला असून निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका. उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही असं नरेंद्र मोदी म्हणाले. ठाकरेंच्या सेनेने भाजप सोबत समझोता केला आहे, काँग्रेसने देखील त्यांच्या सेनेपासून फारकत घेतली आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसचा प्रचार करत नाहीत हे काँग्रेसला लक्षात आलं. ठाकरेंच्या सेनेने काँग्रेसला फसवलं,” असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात समझोता झाला असून कल्याण लोकसभा मतदारसंघात नूरा कुस्ती सुरू आहे,” असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा एकत्र आल्या तर आश्चर्य मानू नका, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर हे कल्याण लोकसभेचे वंचितचे उमेदवार डॉ. शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचार सभेसाठी उल्हासनगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेऊन हा टोला लगावला आहे.
हे ही वाचा:
होर्डिंगकिंग भावेश भिंडेवर बलात्काराच्या गुन्ह्यासह २१ गुन्हे
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे म्हणून मुस्लिम समुदायाने दर्ग्यावर चढवली चादर!
दिल्ली: प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याचा २०० वेळा विमान प्रवास!
प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीसोबत युती करायची होती मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ही युती फसली होती. त्यावेळीही प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटावर वारंवार टीकेची तोफ डागली होती.