बेंगळुरूने दिल्लीवर ४७ धावांनी मात करून सलग पाचवा विजय मिळवला. प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही बेंगळुरूचे स्थान कायम आहे. बेंगळुरूने १३ सामन्यांत सहा विजय मिळवले असून त्यांना सात पराभवांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्या गुणतक्त्यात एकूण १२ गुण आहेत. दिल्लीवरील या विजयामुळे बेंगळुरूचा संघ पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता बेंगळुरूचा शेवटचा सामना १८ मे रोजी चेन्नईविरोधात चिन्नास्वामी स्टेडिअमवरच रंगेल. या सामन्यावरच दोन्ही संघांचे भविष्य ठरेल. चेन्नई विजयी झाल्यास बेंगळुरूचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल तर, बेंगळुरूला चेन्नईवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. हा विजय मिळवला तरीही बेंगळुरूला अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.
बेंगळुरू, दिल्ली आणि लखनऊ या तिन्ही संघांच्या खात्यात १२ गुण जमा आहेत. लखनऊने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. तर, दिल्ली आणि बेंगळुरूचे प्रत्येकी १३ सामने झाले आहेत. कोलकात्याचा संघ आधीच १८ गुण जमा करून प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. तर, राजस्थान १२ सामन्यांत १६ गुण मिळवून दुसऱ्या स्थानी आहे. चेन्नई १३ सामन्यांत १४ गुण मिळवून तिसऱ्या तर, हैदराबादचा संघ १२ सामन्यांत १४गुणांनिशी चौथ्या स्थानी आहे.
दिल्लीविरोधात पहिल्यांदा फलंदाजी करताना बेंगळुरूने २० षटकांत नऊ विकेट गमावून १८७ धावा केल्या होत्या. रजत पाटीदारने ३२ चेंडूंत ५२ धावा आणि विल जॅक्सने२९ चेंडूंत ४१ धावा केल्या. विराट कोहलीने २७ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना दिल्लीचा संघ १९.१ षटकांत केवळ १४० धावाच करू शकला. ऋषभ पंतच्या अनुपस्थित कर्णधारपद भूषवणाऱ्या अक्षर पटेलने ३९ चेंडूंत ५७ धावा केल्या. यश दयालने तीन आणि लोकी फर्ग्युसनने दोन विकेट घेतल्या.
बेंगळुरूची खेळी
नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या बेंगळुरूच्या फलंदाजांची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार फाफ डुप्लेसिस पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो सहा धावांवर असताना मुकेश कुमारने त्याला बाद केले. त्यानंतर विटार कोहलीने ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर काही फटके लगावले. मात्र इशांतनेच त्याला यष्टीरक्षक अभिषेक पोरेल याच्याकरवी झेलबाद करून बेंगळुरूला दुसरा धक्का दिला. विराटने एक चौकार व तीन षटकारांसह १३ चेंडूंत २७ धावा केल्या. त्यानंतर विल जॅक्सने रजत पाटीदारसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूंत ८८ धावांची भागीदारी केली. ही जोडी रसिख डार सलामने फोडली. रजत हा आयपीएल कारकिर्दीतले सातवे आणि या हंगामातील पाचवे अर्धशतक ठोकून बाद झाला. त्याने ३२ चेंडूंत तीन चौकार व तीन षटकारांसह ५२ धावा केल्या. तर, जॅक्स २९ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ४१ धावा करून बाद झाला.
महिपाल लोमरोर (१३), दिनेश कार्तिक (०) और स्वप्निल सिंह (०) फारशी चमक दाखवू शकले नाही. कर्ण शर्मा सहा धावा करून धावचित झाला. तर, सिराज शेवटच्या चेंडूवर धावचित झाला. तो खातेही उघडू शकला नाही. कॅमरन ग्रीन २४ चेंडूंत एक चौकार व दोन षटकारासह ३२ धावा करून बाद झाला. दिल्लीच्या वतीने खलील अहमद आणि रसिख डार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर, ईशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
दिल्लीची खेळी
चिन्नास्वामी स्टेडिअमवर १८८ धावांचे लक्ष्य सोपे मानले जाते मात्र पंतची अनुपस्थिती दिल्लीला प्रकर्षाने जाणवली. दिल्लीचा संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. डेव्हिड वॉर्नर एक तर अभिषेक पोरेल दोन धावा करून बाद झाला. त्यानंतर चांगली फलंदाजी करणारा जेक फ्रेजर मॅकगर्क आठ चेंडूंत २१ धावा करून धावचित झाला. त्याने दोन चौकार व दोन षटकार लगावले.
हे ही वाचा:
‘तुम्ही ‘आप’ला मत दिल्यास मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही’
‘पेज थ्री संस्कृतीवर महाराष्ट्र चालवता येत नाही’
प्रशासनाच्या आदेशानंतरही गुजरातमधील जामनगरच्या रणजितसागर धरणावरील बेकायदा दर्गा ‘जैसे थे’
शादाब, शोएबकडून अल्पवयीन दलित मुलीचा विनयभंग!
चौथा सामना खेळणारा कुमार कुशाग्र केवळ दोन धावा करू शकला. त्यानंतर शाई होप याने कर्णधार अक्षर पटेलसह पाचव्या विकेटसाठी ३६ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी केली. होप २३ चेंडूंत २९ धावा करून बाद झाला. तर, ट्रिस्टन स्टब्स तीन धावा करून धावचित झाला. अक्षरने आयपीएलमधील आपले तिसरे अर्धशतक ठोकले आणि २९ चेंडूंत पाच चौकार व तीन षटकार लगावून ५७ धावा करत तो बाद झाला.
रसिख डार सलाम १०, कुलदीप यादव सहा आणि मुकेश कुमार तीन धावा करून बाद झाला आणि संपूर्ण संघ १९.१ षटकांत १४० धावा करून बाद झाला. बेंगळुरूच्या वतीने यश दयालने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर, लोकी फर्ग्यूसनने दोन विकेट घेतल्या. स्वप्नील सिंह, मोहम्मद सिराज आणि कॅमरन ग्रीन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.