महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी, माजी मंत्री आणि शिवसेना (उबाठा)नेते आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला. आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेबद्दल त्यांना विचारले असता, ‘ते (आदित्य ठाकरे) अडीच वर्षे मंत्री होते, तेव्हाची त्यांची कामगिरी तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र पेज ३ संस्कृतीने चालत नाही. त्यांनी आमदार म्हणून काहीच लक्षणीय कामगिरी केली नाही. तुम्हाला पुरावे हवे असल्यास वरळी मतदारसंघात जाऊन पाहा,’ अशी टीका त्यांनी केली.
फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे यांचा मुंबईतील सेलिब्रिटी जगताशी संबंध असल्याचा दावा करत भाजपनेते अनेकदा त्यांच्यावर टीका करत असतात. आदित्य ठाकरेंसोबत यापूर्वी चित्रपटांतील अनेक कलाकारांना पाहण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादी पक्षाने आघाडीत सामील व्हावे, असे आवाहन केले होते. त्यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षाचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणताही प्रस्ताव दिला नाही, तो केवळ एक सल्ला होता,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
प्रशासनाच्या आदेशानंतरही गुजरातमधील जामनगरच्या रणजितसागर धरणावरील बेकायदा दर्गा ‘जैसे थे’
शादाब, शोएबकडून अल्पवयीन दलित मुलीचा विनयभंग!
‘पगडी घालून पंतप्रधान मोदी पोहचले गुरुद्वारात, स्वतः रोटी लाटून जेवणही वाढलं’
“मशाल आणि तुतारी ४ जूननंतर राज्यात दिसणार नाहीत”
‘पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना एनडीएमध्ये सामील होण्याच्या प्रस्ताव दिल्याचे दावे चुकीचे आहेत. हा प्रस्ताव नसून केवळ एक सल्ला आहे. मी याआधीही म्हटले आहे की, काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे आणि त्यामुळे त्यात सामील होण्याचा काही फायदा नाही. त्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात पुन्हा सहभागी होणे, हाच एक चांगला पर्याय आहे,’ असे फडणवीस म्हणाले.
‘हा प्रस्ताव नाही. हे एक उपहासात्मक विधान आहे आणि त्यांना वास्तव सांगण्याचा एक मार्ग आहे,’ असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी जुळवून घेणे फार कठीण आहे, असेही ते म्हणाले.‘उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींसाठी ज्या पातळीचे शब्द वापरतात ते पाहून मला आश्चर्य वाटते. ते मोठे नेते आहेत की खालच्या पातळीवरचे राजकारणी, असा प्रश्न मला पडतो. ग्रामपंचायतीचे नेतेही अशी भाषा वापरत नाहीत. आमचे कार्यकर्ते हे सहन करू शकत नाहीत,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.