दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाला असून त्यांनी शनिवार, ११ मे रोजी केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभेद्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “पुढील वर्षी १७ सप्टेंबर रोजी मोदी ७५ वर्षांचे होणार असून त्यांना राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल आणि त्यांच्याजागी अमित शाह पंतप्रधान होतील,” असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता. या वक्तव्यावर आता खुद्द अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी तेलंगणाच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी हैदराबाद येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी केजरीवाल यांच्या वक्तव्याविषयी त्यांना विचारणा करण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी हे ७५ वर्षांचे होणार असल्यामुळे केजरीवाल आणि कंपनीला फार आनंदित होण्याची गरज नाही. ७५ व्या वर्षी निवृत्त व्हावे, हे भाजपाच्या घटनेत कुठेही लिहिलेले नाही. नरेंद्र मोदी हे आपली टर्म पूर्ण करून पुढेही देशाचे नेतृत्व करत राहतील. याबाबत कोणताही संभ्रम नाही. विरोधक हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी जोरदार टीका अमित शाह यांनी केली आहे.
अमित शाह यांनी विश्वास दिला आहे की, “नरेंद्र मोदी हेच २०२९ पर्यंत पंतप्रधानपदावर राहतील. तसेच २०२९ च्या निवडणुकीचे नेतृत्वही त्यांच्याकडेच असणार आहे. इंडिया आघाडीसाठी आनंद वाटावा, अशी कोणतीही बातमी नाही. विरोधक अपप्रचार करून निवडणूक जिंकू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी देशाला पुढे घेऊन गेले आहेत, तसेच देशाला ते आणखी पुढे घेऊन जाणार आहेत. देशातील जनतेलाही हे पटलेले आहे,” असं अमित शाह म्हणाले.
हे ही वाचा:
निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे जाणार अज्ञातवासात
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकविरोधी निदर्शनात फडकला तिरंगा
२५ गोळ्या मारून पाकिस्तनाचे ड्रोन बीएसएफने पळवून लावले!
लव्ह जिहादचे प्रकरण; हिंदू असल्याची बतावणी करून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार
पुढे ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना अमित शाह म्हणाले की, “देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील जनता पंतप्रधान मोदी यांच्यामागे आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही याची कल्पना आहे की, ४०० पार जाणार आहोत. तसेच मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळेच अशाप्रकारचे विधान करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”