देशातील मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा काल अखेरचा दिवस होता. बारामतीतील शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा काल पार पडली. या सभेत शरद पवार फक्त चार मिनिटे बोलू शकले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांचे सोमवारचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले. एकूणच मुलीच्या विजयासाठी शरद पवारांनी जी मेहनत घेतली ती लक्षात घेता, सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही निवडणूक कठीण आहे, हे बऱ्यापैकी स्पष्ट झालेले आहे.
महाराष्ट्रातील ११ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीसाठी १० जागा लढवत आहे. त्यापैकी बारामती, माढा, सातारा या तीन जागांच्या निवडणुका उद्या होणार आहेत. उर्वरीत जागांमध्ये सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, लातूर, रत्नागिरी, रायगड, धाराशिव या जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात राजकीय वातावण तापलेले असताना पाराही चढलेला आहे. भर उन्हात सभांचा धुरळा उडतोय. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभांचा धडाका लावला आहे. शरद पवारांच्या पक्षात आता स्टार प्रचार म्हणून ते एकटेच उरले आहेत. त्यामुळे पवारांना जास्त मेहनत करावी लागते आहे.
अजित पवार गेली २० वर्ष हा मतदार संघ सांभाळतायत. कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत, असे जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले तेव्हा माझा जनतेवर विश्वास आहे, असे उत्तर पवारांनी दिले होते. परंतु या उत्तरावर बहुधा त्यांचाच विश्वास नसावा.
तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीपूर्वी रोहीत पवार एका सभेत रडले, सुप्रिया सुळे भावनिक झाल्या. इतके अश्रू वाहुन गेले आहेत की आता डोळ्यातून पाणीच येत नाही, अशी घाऊक भावूक भाषा त्यांनी प्रचारादरम्यान वापरली. बारामतीतील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पवारांची प्रकृती खालावणे हा त्याच भावनिक राजकारणाची कडी होती का हे कळायला मार्ग नाही. भारताच्या निवडणुकांमध्ये सहानुभूती हा घटक खूप प्रभावी ठरल्याचे आकडे सांगतात. १९८४ लोकसभा निवडणूक त्याचे मोठे उदाहरण आहे.
पवारांना २०१९ मध्ये पावसात भिजण्याचा प्रयोग केला, त्यामागेही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होता. या वयात माणूस पावसात भिजतोय, प्रचार करतोय, अशी चर्चा घडवणे हे भिजण्या मागचे प्रयोजन होते. परंतु पवारांचे वय, त्यांना असलेला दुर्धर आजार पाहाता, त्यांना दगदगीमुळे त्रास झाला असेल तर त्यात फार आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
हे ही वाचा:
पूंछ हल्ल्याप्रकरणी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी, २० लाखांचे बक्षीस जाहीर!
दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या शाळांना बॉम्बची धमकी!
‘४ जून ही बीजेडी पक्षाची एक्स्पायरी डेट’
क्रिकेटचा चेंडू प्रायव्हेट पार्टला लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू!
पवारांच्या या स्थितीला जबाबदार पवार आहेत, त्यांचा कन्या मोह आहे. घराणेशाहीवर असलेले त्यांचे प्रेम आहे. खरं तर सुनेत्रा पवार खासदार झाल्या तरी बारामती पवारांकडेच राहते, सुप्रिया खासदार झाल्या तरी पवारांकडे. कारण त्या सुळे असल्या तरी त्या वारसा मात्र पवारांचा सांगतात. थोरल्या पवारांनी कारण नसताना लेकीची बाजू घेऊन सुनेला दूर लोटले. उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानात बारामतीचे मतदार सुप्रिया सुळे यांची माहेरातून सासरी पाठवणी करणार अशी दाट शक्यता आहे. कालपर्यंत पडद्या मागून बारामतीची सूत्र सांभाळणारे अजित पवार आता ही सूत्र समोरून ताब्यात घ्यायला तयार आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)