प्रतिपक्ष या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून परखड राजकीय विश्लेषण करणारे भाऊ तोरसेकर याना नुकताच दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला गेला. त्यासंदर्भात भाऊंनी आपल्या भावना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने माझा सन्मान होणार हे कळल्यावर मी गोंधळून गेलो होतो कारण त्या पुरस्काराने गौरविण्यात येणारे इतर मान्यवर हे विविध क्षेत्रातील दिग्गज होते. त्यांच्या पंक्तीत आपल्याला स्थान देण्यात आले यामुळे मनात गोंधळ झाला होता. प्रत्यक्ष पुरस्कार सोहळ्यात संगीतकार हृदयनाथ मंगेशकर मला म्हणाले की, मंगेशकर कुटूंबाची सकाळ माझ्या आवाजाने होते. याचे मलाच हसू आले. अवघ्या जगाला आपल्या स्वरांनी मोहित करणाऱ्या या कुटूंबाला माझ्या भसाड्या आवाजाची मोहिनी कशी काय असू शकते? अशा शब्दात भाऊ तोरसेकरांनी या पुरस्काराच्या निमित्ताने आपले मनोगत केले.
प्रतिपक्ष या आपल्या युट्युब चॅनेलवर त्यांनी हा किस्सा ऐकवला. भाऊ म्हणाले की, जानेवारी महिन्यात मला मंगेशकर यांच्याकडून फोन आला. मी भारती मंगेशकर बोलत असल्याचे दुसरीकडून सांगण्यात आले. तेव्हा मी विचारले की, म्हणजेच भारती मालवणकर ना! तेव्हा त्या हसल्या. हे सांगण्याचे कारण म्हणजे जुन्या काळातील अभिनेते दामूअण्णा मालवणकर यांच्या त्या सुपुत्री. त्यामुळे त्या काळात ज्यांच्या विनोदावर आम्ही खळखळून हसत असू अशा एका प्रतिभावान कलाकाराच्या मुलीशी संवाद साधता आला याचा आनंद झाला होता.
हे ही वाचा:
दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या शाळांना बॉम्बची धमकी!
‘४ जून ही बीजेडी पक्षाची एक्स्पायरी डेट’
क्रिकेटचा चेंडू प्रायव्हेट पार्टला लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू!
‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी मोहिमेवरून सागरी प्राण्याला मिळाली नवी ओळख!
भाऊ म्हणाले की, अमिताभ बच्चन, ए आर रहमान, अशोक सराफ, रणदीप हुड्डा अशा सगळ्या कलाकारांच्या पंक्तीत मला बसवण्यात आले याचा आनंद होता आणि आश्चर्यही होते. कारण माध्यमांच्या मुख्य प्रवाहात मी आता नाही किंबहुना मुख्य प्रवाहातील माध्यमांविरुद्ध मी बोलत असतो तरीही माझा सत्कार केला जाणार आहे, याचे मला अप्रूप वाटले.
भाऊंनी एक खंत यासंदर्भात बोलून दाखवली की यावेळी हृदयनाथ यांच्या शूर आम्ही सरदार आम्हाला…या प्रसिद्ध गाण्याचे विडंबन आपण केले होते. मुंबईत काही वर्षांपूर्वी बोकाळलेल्या माफिया गॅंगच्या पार्श्वभूमीवर ते गाणे रचले होते. ते त्या कार्यक्रमात ऐकवून दाखवण्याची इच्छा होती पण मीच गोंधळलेलो असल्यामुळे ते राहून गेले.
भाऊंनी ते विडंबन आपल्या व्हिडिओत ऐकवले. ते असे होते…
नाही कुठे घरदार आम्हाला
काय कुणाची भीती?
गेम नेम अन खोक्यासाठी
घेऊ कायदा हाती!
गल्लीच्या बोळात गवसलं
रामपुरीचं पातं
चॉपरशी तर लगीन लागलं
कट्टा करतो मात
पोलीस येता कुशीत
घेई अशी दुबईची ख्याती
नाही कुठे घरदार आम्हाला
काय कुणाची भीती?