महाविकास आघाडीच्या कार्यकाळात एंटालिया कांड घडले. देशातील क्रमांक एकचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एंटालिया निवासस्थानाबाहेर जिलेटीन स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवण्यात आले. याप्रकरणी सचिन वाझे, एकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, इन्स्पेक्टर सुनील माने आदींनी अटक झाली. यापैकी कोणाचीही अंबानींच्या कॉलरला हात घालण्याची क्षमता नव्हती. या प्रकरणाचा करविता वेगळाच होता. परंतु याप्रकरणाचा सूत्रधार कोण हे गुलदस्त्यात राहिले. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी या सूत्रधाराकडे बोट दाखवले आहे.
एंटालिया प्रकरणातील गुपितं माहीत असल्यामुळे मनसुख हिरण या ठाणेकर नागरिकाने जीव गमावला. त्याता मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत सापडला होता. मनसुखच्या महींद्र स्कॉर्पियोचा हे कांड करताना वापर करण्यात आला होता. पोलिस स्कॉर्पियोचा माग काढत त्याच्यापर्यंत पोहोचणार हे उघड होते. तो या प्रकरणातील हमराज होता. परंतु तो गुन्हेगारी मानसिकतेचा नसल्यामुळे कदाचित तो तोंड उघडू शकेल या भातीपोटी त्याला संपवण्यात आले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, एपीआय सचिन वाझे, सुनील माने यांना याप्रकरणात अटक झाली. सचिन वाझे हा अधिकारी याप्रकरणात महत्वाचा आरोपी होती. त्याने ती स्कॉर्पियो एंटालिया खाली ठेवली होती. मनसुख हिरणला संपवण्याच्या कटात प्रदीप शर्मा, सुनील माने यांच्यासह तोही सहभागी होता.
देशातील सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या इमारतीखाली स्फोटके ठेवून त्याला धमकावण्याचा कट एखादा एपीआय किंवा पीआय दर्जाचा अधिकारी रचू शकत नाही. एखाद्या वजनदार गॉडफादरचा आशीर्वाद असल्याशिवाय हे अशक्य होते. वाझे, शर्मा आणि माने हे केवळ मोहरे आणि खूप छोटे मोहरे होते, त्यांनी केवळ ऑर्डर पाळण्याचे काम केले. मोठ्या राजकीय कटात केवळ प्यादीच मारली जातात, सूत्रधार मात्र मोकाट राहातात, असा अनुभव आहे. त्यामुळे एंटालिया प्रकरणाचा किंगपिन प्रकाशात येण्याची शक्यता कमीच होती.
वाझेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी किती घनिष्ट संबंध होते हे सर्वश्रुत आहे. त्याचा राबता वर्षावर होता. तो एक फुटकळ अधिकारी असून आयपीएस अधिकारी सुद्धा त्याच्या समोर दबत असत. तो त्यांना सूचना द्यायचा. ते पाळतही होते. निलंबित असलेल्या वाझेचा पोलिस दलात पुनर्प्रवेश त्याची क्राईम ब्रँचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये लागलेली वर्णी केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळे शक्य झाली होती. खरे तर निलंबित वाजेला पोलिस दलात पुन्हा एकदा संधी द्या, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात दिला होता. परंतु फडणवीस यांनी तो स्पष्टपणे फेटाळला होता.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंच्या जाहिरातीत पॉर्न स्टारची भूमिका!
लस प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो का काढला?
गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर मुख्यमंत्री योगींचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल!
वाझे तुरुंगात गेल्यानंतरही वाझे हा लादेन नाही, असे प्रशस्तीपत्रक देऊन उद्धव ठाकरे यांनी त्याची जोरदार पाठराखण केली होती. फडणवीस विधानसभेत एंटालिया प्रकरणाचा कच्चाचिठ्ठा खोलत असताना मनसुखचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत तरंगत होता. मनसुखच्या जीवाला धोका आहे, असे फडणवीस इशारा देत होते, तोपर्यंत शर्मा आणि कंपनीने त्याचा गेम संपवला होता. मोठे घबाड मिळवण्यासाठी एंटालियाचा कट रचण्यात आला. अंबांनींसाठी शे-पाचशे कोटी काय फार नाहीत, असा हिशोब असावा. सुटकेसमधून पैसे मिळत होते, परंतु एकत्र कंटेनरमधून पैसा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने अंबानींकडे वक्रदृष्टी वळली होती.
एंटालिया प्रकरणात वाझेचे नाव जेव्हा पुढे आले तेव्हा, त्याचा कर्ताकरविता कोण असेल याचा अंदाज प्रत्येकाला होता. याबाबत सूचक वक्तव्यही होत होती. परंतु त्यावेळी विरोधी पक्ष असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत देत एंटालिया प्रकरणाचे कर्तेधर्ते तत्कालीन राज्यकर्तेच होते, असा गौप्यस्फोट करणे याला विशेष महत्व आहे. फोन टॅपिंग प्रकरणात आपण अडकणार हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मविआचे सरकार पाडले असा दावा संजय राऊत यांनी केला. याबाबत न्यूज24 च्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा फडणवीसांनी त्याला दिलेल्या उत्तरात हा गौप्यस्फोट केला आहे.
संजय राऊत हे खूप छोटे नेते आहेत. त्यांना उत्तर आमचे प्रवक्ते देतात, असे सांगत आधी फडणवीसांनी त्यांची लाज काढली, त्यानंतर मोर्चा मविआ सरकारकडे वळवला. त्यांनी केसापासून नखापर्यंत माझी चौकशी केली. परंतु काही मिळालं नाही. त्यांनी एका पोलिस आयुक्तांना आणून बसवलं, काहीही करा पण देवेंद्र फडणवीसांना अटक करा, असे त्यांना बजावण्यात आलं होते पण ते मला अटक करू शकले नाहीत.
मैने इस सरकार को हिलाके रख दिया, उनकी एकेक चीज को बाहर निकाला, जिस प्रकारसे उन्होने एक उद्योगपती के घर के सामने बॉम्ब रखे मैने उसका पर्दा फाश किया. हे देवेंद्र फडणवीसांचे उद्गार आहेत. हा घटनाक्रम लक्षात घ्या, प्रश्न संजय राऊतांबाबत विचारला जातो आहे. फडणवीस सांगतायत. की मी सरकारला हलवून ठेवलं होते. ज्या प्रकारे त्यांनी एका उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब ठेवला… हे त्यांचे वाक्य आहे. त्यांनी म्हणजे सरकारने असे त्यांना म्हणायचे आहे, असे स्पष्ट दिसते आहे. कारण ते म्हणतायत, मैने सरकार को हिला के रख दिया, उनकी एकेक चीज को बाहर निकाला.
त्यावेळी सरकार उद्धव ठाकरे यांचे होते. ठाकरे आणि वाझे यांचे गूळपीठ होते. वाझेने जिलेटीन कांड्यांनी भरलेली गाडी अंबानींच्या एंटालिया खाली ठेवली असली तरी वाझेची तेवढी औकात नव्हती. हा अंबानींना दहशतवाद्यांचे भय दाखवून त्यांच्याकडून वसूली करण्याचा कट होता. कट यशस्वी झाला असता तर मोठी कमाई झाली असती. अंबानीना धमकावून पैसे काढण्याची क्षमता एकट्या वाजेमध्ये असण्याची शक्यताच नाही. वाझे तुरुंगात आहे. एंटालिया प्रकरणाबाबत त्याने तपास यंत्रणांकडे माहिती निश्चितपणे उघड केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे विद्यमान गृहमंत्री म्हणून त्याची माहिती असणारच. त्या मुलाखतीत अनावधानाने किंवा जाणीवपूर्वक ही बाब फडणवीसांच्या तोंडून बाहेर पडली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)