महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबतचा मुद्दा अखेरीस मार्गी निघाला असून महायुतीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. शिवसेनेकडून नाशिकच्या जागेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांनंतर हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेने त्यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा देखील केली आहे,
काही दिवसांपूर्वी या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. पण, त्यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं. अखेर हेमंत गोडसे यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. हेमंत गोडसे यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत नाशिकमधून विजय मिळवला होता. आता पुन्हा एकला लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यानंतर सलग तिसऱ्यांदा बाजी मारून येथे विजयाची हॅटट्रिक करण्याचा गोडसे यांचा प्रयत्न असेल.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/R8Ykv8WUXs
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
हे ही वाचा:
अभिनेत्री रुपाली गांगुली यांचा भाजपात प्रवेश!
राहुल गांधींच्या वक्तव्यावर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचा आक्षेप
लैंगिक छळप्रकरणी प्रज्वल रेवण्णा, वडिलांना कर्नाटक एसआयटीचे समन्स!
‘सॉरी पापा’ लिहीत नीटच्या परीक्षार्थी मुलाची आत्महत्या
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. नाशिकच्या जागेबाबत तिढा सुटला असल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. त्यानंतर काही वेळातच गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली. हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. शिवाय महायुतीमधील सर्व नेते पाठिशी राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून याचे स्वागत केले. दरम्यान, शिवसेनेने ठाणे आणि कल्याणच्या उमेदवारांची देखील घोषणा केली आहे. ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे.