लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांच्या प्रचारसभांना चांगलाच जोर आला आहे. दिग्गज नेत्यांकडून आपल्या पक्षातील उमेदवारासाठी सभा घेण्याचा धडाका सुरू आहे. अशातच भाजपाने त्यांच्या नेतृत्वातील एनडीएकडून ४०० पारचा नारा दिलेला आहे. यासाठी भाजपाचे अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभांचा धडाका लावला असून सध्या दोन दिवस ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसात नरेंद्र मोदी यांनी सहा सभा घेतल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विविध सहा मतदारसंघात सभा घेत विरोधक आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी सोमवार, २९ एप्रिल रोजी महाराष्ट्रात सोलापूर, कराड, पुणे येथे सभांना संबोधित केलं. तर, मंगळवार, ३० एप्रिल रोजी नरेंद्र मोदींनी माढा, धाराशीव, लातूर येथे सभा घेत विरोधाकांचा चांगलाच समाचार घेतला.
नरेंद्र मोदींचा सोलापूरातून काँग्रेसवर घणाघात
सोलापूरमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या इंडी आघाडीवर निशाणा साधताना म्हटले की, “इंडी आघाडीमध्ये नेत्यांच्या नावावरून महायुद्ध चालू आहे. इंडी आघाडीने एक नवा फॉर्मुला आणला आहे. पाच वर्षात पाच पंतप्रधान. दुसरीकडे नकली शिवसेना म्हणत आहे की, पंतप्रधान पदासाठी आमच्या पक्षात खूप नेते आहेत आणि त्यांचा रोज बडबडणारा नेता म्हणतो एका वर्षात आम्ही चार पंतप्रधान केले तर काय बिघडले. तुम्हीच मला सांगा या फॉर्मुल्याने देश चालू शकेल का?” अशी घाणाघाती टीका नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली आहे.
“काँग्रेस आणि इंडी आघाडींच्या नेत्यांचा खरा चेहरा समोर आल्यामुळे त्यांचा तिळपापड झाला आहे. त्यांच्याकडे काहीच बोलायला नसल्यामुळे फक्त मोदीला शिव्या देण्याचे काम हे करत आहेत. शिव्यांची संपूर्ण डिक्शनरी उघडून ठेवली आहे. त्यांचे व्हिजन नाहीये मात्र आमच्याकडे आहे.ते पुढे म्हणाले की, आम्ही व्होटबँकसाठी कोणत्याही जातीचा वापर करत नाही, तशी आमची नीती नाहीये,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या सभेतून केली.
कराडच्या सभेतून नरेंद्र मोदींचा फेक व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसवर निशाणा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ एडीट करून तेलंगाना काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आला होता. याचं मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी कराडमधून काँग्रेसवर हल्लाबोल केला. “आमचे फेक व्हिडिओ पसरवले जात आहेत, कधी माझा आवाज, कधी अमित शाह यांचा आवाज तर कधी नड्डां यांच्या आवाजामध्ये व्हिडिओ पसरवले जात आहेत. जे कामाच्या जोरावर एनडीएशी राजकीय लढाई लढू शकत नाहीत, ते आता सोशल मीडियावर खोटे व्हिडिओ पोस्ट करत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून अशा गोष्टी पसरवत आहेत ज्याचा आम्ही कधी विचारही केला नाही. देशामध्ये वातावरण बिघडण्याचा प्रयत्न होत आहे,” अशी सडकून टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.
पुण्याच्या सभेतून शरद पवारांना टोला
शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधानांनी पुण्याच्या सभेत त्यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काही भटके आत्मे आहेत. ज्यांची इच्छा पूर्ण होत नाही, ज्यांची स्वप्ने अपुरी राहतात. महाराष्ट्र सुद्धा या भटकती आत्माचा शिकार झाला आहे. महाराष्ट्रातील एका नेत्याने आपल्या महत्वाकांक्षासाठी हा खेळ ४५ वर्षांपूर्वी सुरू केला. त्यानंतर महाराष्ट्र अस्थिरतेच्या मार्गावर चालून गेला. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वतःच्या पक्षालाही अस्थिर करतात. २०१९ मध्ये या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला होता, हे महाराष्ट्रातील जनता जाणते आणि आता ही आत्मा देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ करत आहे. या अशा अस्थिर आत्मापासून बचाव करून भारताला स्थिर आणि मजबूत होऊन पुढे जाण्याची गरज आहे,” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
मढ्याच्या सभेत शरद पवार आणि काँग्रेसवर निशाणा
नरेंद्र मोदी म्हणाले की, “१५ वर्षांपूर्वी एक नेते या तुमच्या भागात आले होते. त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ घेऊन सांगितलं होतं की या भागात पाणी पोहचवणार. त्यांनी पाणी पोहचवलं आहे का? तर नाही. तुम्हाला हे लक्षात आहे ना? त्यांनी वचन दिलं होतं ते वचन त्यांनी पाळलं नाही त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. त्यांनी यानंतर या ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवली नाही. विदर्भ, मराठवाड्याला थेंब थेंब पाण्यासाठी तडफडवण्याचं पाप काँग्रेसच्या लोकांनी आणि काही नेत्यांनी केलं,” अशी टीका मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केली. तसेच नरेंद्र मोदी म्हणाले की, “मोदी सरकारची दहा वर्षे आणि काँग्रेसची साठ वर्षे यांच्यातला फरक पाहत आहात. काँग्रेसने ६० वर्षे पंचायत समिती ते संसदेपर्यंत राज्य केलं. मात्र ६० वर्षांत जे काँग्रेसला जमलं नाही ते आम्ही १० वर्षांत करुन दाखवलं,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
धाराशिवमधून पुन्हा नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचा पुनरुच्चार
नरेंद्र मोदींनी प्रभू श्रीराम यांच्या मंदिरावर भाष्य करताना म्हटले की, “काँग्रेसच्या काळात या मंदिराचे निर्माण रोखण्यात आले. मोदी सरकारने प्रभू रामाचे मंदिर निर्माण केले असे म्हटले. तसेच राज्यातील नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने राममंदिराचे निर्माण नाकारले.” तसेच त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. “काँग्रेसची एकच ओळख ती म्हणजे विश्वासघात. ६० वर्षात पाण्यासाठी काँग्रेसने जे केलं नाही ते १० वर्षात आम्ही केले. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या वाट्याचे पैसे काँग्रेसच्या नेत्यांच्या खात्यात जात होते. पण मोदी सरकारने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात पोहचवले आहेत,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
‘जनतेच्या प्रगतीचा मोदी पॅटर्न, बाकी सगळे पॅटर्न भंगारात’
टी- २० विश्वचषकासाठी भारताचे शिलेदार ठरले; १५ खेळाडूंची घोषणा
कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने रेवण्णावर का कारवाई केली नाही ?
“काँग्रेसची ओळख म्हणजे विश्वासघात”
नरेंद्र मोदींचा लातूरमधून काँग्रेसच्या वचननाम्यावर निशाणा
लातूरमध्ये पार पडलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारी कारभारावर भाष्य करत टीकेची झोड उठवली. “काँग्रेसच्या यावेळेच्या वचननाम्यात मुस्लिम लीगची छाप आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांना, लातूरच्या लोकांना काँग्रेसपासून सावध होण्याची गरज आहे. काँग्रेसने कधीच एससी, एसटी, ओबीसी नेतृत्वाला पुढे जाऊ दिलं नाही. गेल्या १० वर्षात एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे सर्वाधिक आमदार आणि खासदार भाजपा आणि एनडीएसोबत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात ६० टक्क्यांपेक्षा जास्त मंत्री हे एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे आहेत. देशाचा एससी, एसटी, ओबीसी समाज मोदींवर विश्वास ठेवतो कारण गेल्या १० वर्षात कोट्यवधी कुटुंबांचं आयुष्य बदललं आहे,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.