भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी- २० विश्वचषक २०२४ साठी भारतीय १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर चार राखीव खेळाडूंची निवड केली आहे. रोहित शर्मा याच्याकडे कर्णधारपदाची धुरा असणार आहे हे आधीच स्पष्ट झाले होते. मात्र, त्याच्या नेतृत्वात कोणते खेळाडू खेळणार आहेत याकडे साऱ्यांचे लक्ष होते. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये २० संघ सहभागी होणार आहेत.
न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड या काही संघांनी खेळाडूंची घोषणा केली असून आता भारतीय संघातील खेळाडूंची नावेही समोर आली आहेत. विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या १५ खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघात चार फलंदाज, चार अष्टपैलू, दोन यष्टीरक्षक, दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांना निवडले आहे. युवा खेळाडूंना संधी मिळालेली असताना काही स्टार खेळाडूंना मात्र डच्चू मिळाल्याचे चित्र आहे. शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल यांना संधी मिळाली असून केएल राहुल, रवि बिश्नोई अशा काही खेळाडूंना संधी मिळालेली नाही. आयपीएल संपल्यावर लगेचंच टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. येत्या १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे टी-२० चे सामन्यांचे आयोजन होत आहे.
रोहित शर्मा पुन्हा एकदा टी-२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर विराट कोहलीलाही या संघात स्थान मिळाले आहे. ऋषभ पंतचे संघात पुनरागमन झाले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्याचबरोबर संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हे खेळाडू प्रथमच आयसीसीच्या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
हे ही वाचा:
“काँग्रेसची ओळख म्हणजे विश्वासघात”
छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांसोबत चकमक, ७ माओवादी ठार!
शरद पवार कृषिमंत्री असताना काय केले?
नाशिक: एसटीची ट्रकला धडक, १० जण ठार!
स्टार खेळाडूंना डच्चू
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, केएल राहुल, रवि बिश्नोई, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक यांना संघामध्ये निवडण्यात आलेले नाही. शुभमन गिल आणि रिंकू सिंह यांना राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकात केएल राहुल संघाचा उपकर्णधार होता, पण यंदा त्याला संघात स्थानही मिळवता आले नाही. राहुल याच्या ऐवजी ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली आहे. रवि बिश्नोई याच्या नावाचीही चर्चा होती मात्र त्याला संघात स्थान मिळवता आले नाही. बीसीसीआयने कुलदीप, चहल, अक्षर आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
टी-२० विश्वचषक २०२४साठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.