सध्या रेमडेसिवीरवरून महाराष्ट्रात राजकारण तापलेले असून यात राज्य सरकार विरूद्ध केंद्र सरकार असा कलगीतुरा बघायला मिळत आहे. अशात महाराष्ट्राला रेमडेसिवीर पुरवणाऱ्या कंपनीच्या माणसालाच पोलीसांनी ताब्यात घेतल्याचा प्रकार पाहायला मिळाला. ही माहिती मिळताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तडक पोलीस उपायुक्तांचे कार्यालय गाठले. तेव्हा चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे कारण पोलीसांकडून पुढे करण्यात आले.
ब्रुक फार्मा या औषध उत्पादक कंपनीच्या राजेश जैन यांना शनिवारी रात्री बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील पोलीसांनी ताब्यात घेतले. दहा पोलीस अधिकारी हे रात्री त्यांच्या घरी गेले आणि त्यांना ताब्यात घेतले गेले. यावेळी ताब्यात घेण्याचे कोणतेही ठोस कारण सांगण्यात आले नाही. ही बातमी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कळताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर नेत्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालय गाठले. पोलीसांना ह्या संपूर्ण घडल्या प्रकाराविषयी जाब विचारला असता पोलीसांकडून, “अटक केली नसून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते” असे सांगण्यात आले. “आमच्याकडे अशी माहिती होती की काही निर्यातदारांकडे रेमडेसिवीरचा ६०,००० वायल्सचा साठा उपलब्ध आहे आणि या माहितीच्या आधारे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले.” असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण पोलीसांकडे ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याविषयी ठोस माहिती उपलब्ध नव्हती. अन्न आणि औषध विभागाकडून त्यांना एक पत्र मिळाले होते. पण कोणतीही ठोस माहिती मिळाली नव्हती असे पोलीसांकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारची रेमडेसिवीरच्या किंमतीसाठी घासाघीस
मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी
गुजरातचे पत्र दाखवता, मग महाराष्ट्राचे का लपवता?
… कारण ठाकरे सरकार निकम्मे आहे!
मंत्र्यांच्या ओएसडींनी फोन करून धमकावले
शनिवारी दुपारी याच अधिकाऱ्याला राज्य सरकारमधील एका मंत्र्यांच्या ओएसडींनी फोन केला आणि फोन करून धमकावले. धमकी मागचे मुख्य कारण हे होते की ब्रुक फार्मा ही कंपनी महाराष्ट्रातील जनतेला वाटप करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवणार होती. या संबंधीची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांनी हा धमकीचा फोन केला. “तुम्ही फडणवीस, दरेकरांच्या म्हणण्यावर असे कसे रेमडेसिवीर देऊ शकता?” अशी दमदाटी त्यांना करण्यात आली. ‘योगायोग’ म्हणजे त्यानंतर अवघ्या काही तासांतच ब्रुक फार्मा कंपनीशी संबंधित त्या अधिकाऱ्याला पोलीसांनी ताब्यात घेतले.
काही दिवसांपूर्वी भारत सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली. निर्यातीचा हा माल महाराष्ट्रातील गरजुंना मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीकडून पुढाकार घेतला गेला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड हे दमणला जाऊन ब्रुक फार्मच्या अधिकाऱ्यांना भेटले. केंद्रीय प्रशासनाशी या संबंधी समन्वय साधण्यात आला. या संबंधीच्या सर्वच आवश्यक परवानग्या भाजपाकडून मिळवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत उत्पादक कंपनीच्या एका महत्वाच्या अधिकाऱ्याला धमकावणे आणि पोलिसांनी उचलणे हे घाणेरडे राजकारण असल्याचे भाजपाकडून म्हटले जात आहे. “आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी रेमडेसिवीर आणण्याचा प्रयत्न करतोय म्हणून त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर तो दुर्दैवी आहे.” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात एकीकडे सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असताना शनिवारी रेमडेसिवीर वरून राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. ठाकरे सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून रेमडेसिवीरच्या संदर्भात केंद्र सरकारवर अनेक खोटे आरोप केले. पण प्रत्येकवेळीच ते तोंडावर पडले. ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याला पोलीसांनी ताब्यात घेणे हा या शनिवारी रंगलेल्या राजकारणातील क्लायमॅक्स सिन होता