काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी तिकीट मिळाले आहे. यापूर्वी मुंबईतील काही जागा ठाकरे गटाने स्वतःकडे घेतल्यावर वर्षा गायकवाड यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता उमेदवारी घोषित झाल्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “वर्षा गायकवाड यांना खासदार करुन दिल्लीला पाठवणार आहे. देशात हुकूमशाही येऊ नये, राज्यघटना बदलू नये यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी लढतेय आणि जिंकणार आहे.”
यावेळी वर्षा गायकवाड बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझं मत हे तुम्हाला मिळणार आहे. पंजाला पहिल्यांदा मतदान करत असलो तरी त्या हातामध्ये मशाल आहे. त्याचा एकत्रित परिणाम होईल त्यावेळी तुतारी फुंकणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे हे उत्तर मध्य मुंबईत राहतात आणि त्यांनी साथ दिलेल्या महाविकास आघाडीमुळे उद्धव ठाकरेंना यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा:
ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी संदेशखालीत सीबीआयकडून छापेमारी
बोटाला शाई दाखवा आणि डोकं हलकं करा
‘सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने’
पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल भारतीय विद्यार्थिनीला अटक
यावेळी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “७० हजार कोटींचा घोटाळा, शिखर बँक घोटाळ्याबाबत आरोप होत होते. हे लोक तिकडे आल्यानंतर त्यांना क्लीन चीट कशा मिळाल्या,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “नाना पटोले म्हणतात तसं, काही लोक चावीचं खेळणं आहेत, जशी चावी दिली जाईल तसं खेळतात,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.