देशात १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील मतदान यशस्वी पार पडल्यानंतर आता बुधवार, २६ एप्रिल रोजी दुसरा टप्पा पार पडत आहे. राज्यातील ८ जागांसह देशातील ८८ जागांवर मतदान सुरू झाले आहे. देशभरातील १ हजार २०२ उमेदवारांचा निकाल आज पेटीबंद होणार आहे. दुपारचे ऊन टाळण्यासाठी म्हणून मतदारांनी सकाळपासूनचं मतदान केंद्रावर गर्दी केली आहे.
राज्यात विदर्भात आठ जागांवर २०४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज होणाऱ्या मतदार संघात सर्वाधिक उमेदवार अमरावतीमध्ये आहेत. अमरावतीमध्ये ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर, सर्वात कमी उमेदवार अकोल्यात आहेत. याठिकाणी १५ उमेदवार लढतीत आहेत. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. प्रत्येक बूथ केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
देशातील ८८ जागांसाठी १५.८८ कोटी मतदार मतदान करणार आहे. देशात ८९ मतदार संघात मतदान होणार होते. परंतु, मध्य प्रदेशातील बेतूलमध्ये बहुजन समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचे निधन झाल्यामुळे या ठिकाणी तिसऱ्या टप्प्पात मतदान होणार आहे. यामुळे देशात दुसऱ्या टप्प्यात ८९ ऐवजी ८८ मतदार संघात मतदान होणार आहे.
हे ही वाचा:
लंडनमध्ये भारतीय दूतावासावर हल्ला करणारा अटकेत
सलमान खान गोळीबार प्रकरण; हल्लेखोरांच्या पोलीस कोठडीत वाढ, आणखी दोघांना अटक
यूट्यूबर मनीष कश्यपचा भाजपमध्ये प्रवेश!
‘राम मंदिराचा उल्लेख म्हणजे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन नाही’
दुसऱ्या टप्प्यातील मतदानात अनेक हायप्रोफाईल उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात राहुल गांधी, एनी राजा, शशी थरूर, नवनीत राणा, ओम बिर्ला, हेमामालिनी, अरुण गोविल, प्रल्हाद जोशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विदर्भातील पाचपैकी वर्धा, यवतमाळ-वाशीममध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असून अकोला, अमरावती आणि बुलढाणा या मतदारसंघात तिरंगी लढत आहे.