कर्नाटकमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या २३ वर्षीय मुलीची फयाज नावाच्या तरुणाने हत्या केल्यानंतर पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे. अशातच आता कर्नाटक काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी त्यांच्या मुलीच्या हत्येनंतर स्वत:च्या पक्षाला चांगलेच फटकारले आहे. हिरमेठ यांनी म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या मुलीच्या हत्येत सहभागी असलेल्या आठ लोकांची नावे उघडपणे दिलेली असताना अद्याप एकाही व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेस सरकारवर आणि पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निरंजन हिरेमठ यांची कन्या नेहा हिरेमठ या २३ वर्षीय विद्यार्थिनीची तिचा माजी वर्गमित्र फयाज खोंडूनाईक याने १८ एप्रिल रोजी हुबळी येथील BVB कॉलेजच्या कॅम्पसमध्ये चाकूने भोसकून हत्या केली होती. नेहा ही मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सचे (MCA) शिक्षण घेत होती. नेहावर झालेला हल्ला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. फयाजला नंतर अटक करण्यात आली.
यावर, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, नेहाच्या हत्येचे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवले जाईल आणि वेळबद्ध पद्धतीने खटला चालवला जाईल. मात्र, हुबळी-धारवाड महापालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी आपल्या मुलीच्या हत्येचा तपास ज्याप्रकारे सुरू आहे याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मी आठ जणांची नावे उघडपणे दिली आहेत. त्यांनी एकाही व्यक्तीला अद्याप पकडले नाही. माझा आता विश्वास उडाला आहे. ते हे प्रकरण वळवण्याचा प्रयत्न करत असून तुम्हाला ते हाताळता येत नसेल तर ते सीबीआयला द्या,” अशा भावना हिरेमठ यांनी व्यक्त केल्या आहेत.
“या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आयुक्त या महिला आहेत. तरीही त्या मुलीच्या हत्येला गांभीर्याने घेत नाहीत. फक्त आश्वासने देण्याचे काम सुरू आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगत आहेत. ते कोणत्यातरी दबावाखाली काम करत आहेत असे वाटते,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
भाजपाने निकलापूर्वीच लोकसभेचे खाते उघडले! सुरतमध्ये मुकेश दलाल बिनविरोध विजयी
घराणेशाहीच्या कारखान्याला लोकांनी कुलूप लावले; राहुल, अखिलेश शोधत आहेत चाव्या!
इस्रायल लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा राजीनामा
‘मठ, मंदिरांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर’
नेहाला निर्दोष आणि प्रतिभावान म्हणत निरंजन हिरेमठ यांनी ‘लव्ह जिहाद’मुळे त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. मारेकऱ्यासोबत एकाच समाजातील चार जण उपस्थित होते. मी माझ्या मुलीशी या विषयावर अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला होता. याची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे. माझ्या मुलीवर झालेला अन्याय इतर मुलींवर होऊ नये, असेही ते म्हणाले. दरम्यान, नेहाच्या हत्येप्रकरणी भाजपाने राज्यव्यापी निदर्शने केली. या घटनेला काँग्रेस सरकारचे ‘तुष्टीकरणाचे राजकारण’ जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.