बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून बिश्नोई टोळीचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. या घटनेत वापरलेल्या दुचाकीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आता या प्रकरणीचे गुजरात कनेक्शन समोर आले आहे.
सलमान खान याच्या घराजवळील गोळीबार प्रकरणी पुढील चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक गुजरातमध्ये दाखल झाले आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस गुजरात येथे पोहोचले आहेत. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल गुजरात येथे फेकल्याची माहिती मिळत आहे. आरोपींनी तापी नदीमध्ये पिस्तुल फेकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तापी नदी येथे पिस्तुलचा शोध घेण्यात येत आहे. मुंबई गुन्हे शाखेचे युनिट- ९ चे प्रमुख दया नायक सध्या गुजरातमध्ये दाखल झाले आहेत.
गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत, त्यांची चौकशी सुरु केली होती. गोळीबार केल्यानंतर आरोपीांनी गुजरातच्या दिशेने पलायन केलं. तेव्हा प्रवासात तापी नदीमध्ये आरोपींनी पिस्तुल फेकल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस देखील गुजरात येथे दाखल झाले आहेत. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. याठिकाणी स्थानिक पोलीस देखील उपस्थित आहेत. चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्यांनी बंदूक सुरतच्या नदीत फेकल्याचे गुन्हे शाखेला सांगितले होते.
हे ही वाचा:
मणिपूरमधील ११ बूथवर पुन्हा मतदान!
इराकमधून सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर पाच रॉकेट डागले!
न्यूज २४ चा माधवी लता यांच्याबाबत खोडसाळपणा, पोस्ट हटवली!
सांगलीतून विशाल पाटील लोकसभा अपक्ष लढणार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर, आरोपी वांद्रे येथील माउंट मेरी चर्च बाहेर पोहोचले. त्यांनी त्याठिकाणी बाईक सोडली आणि वांद्रे स्टेशनसाठी रिक्षा केली. त्यानंतर बोरिवली येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये दोघे चढले आणि सांताक्रुज स्टेशनवर उतरले आणि पुढे गेले. या जागांवर असलेल्या सीटीटीव्ही फुटेजमुळे दोघांबद्दल माहिती समोर आली आहे. दरम्यान, बिश्नोई टोळीचा यात हात असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही या टोळीने सलमान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.