भारताच्या स्टार ऑलिम्पिकपटू विनेश फोगट आणि अंशू मलिक यांनी बिश्केकमध्ये सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत शानदार कामगिरी करून या वर्षी होऊ घातलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळवला आहे.
विनेशने आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात कझाकिस्तानच्या लॉरा गॅनिक्झी हिला १०-०ने पराभूत करून ५० किलो वजनी गटात ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. विनेशने ही लढत ४:१८ मिनिटांत जिंकली. विनेशची लढत आता उझबेकिस्तानच्या अक्तेंगे क्यूनिमजेवा हिच्याशी होईल. अक्तेंगे हिने चीन तैपेईच्या मेंग ह्युसान हसीचा ४-२ने पराभव केला आहे.
अंशू मलिकने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात पॅरिसमध्ये ऑलिम्पिक पात्रता मिळवली. तिने उझबेकिस्तानच्या लॅलोखोन सोबिरावो हिचा ११-०ने पराभव केला. आधी अंशूने बिश्केकने दोन्ही सामने तांत्रिकी श्रेष्ठतेनुसार जिंकले होते.
विनेशने महिलांच्या ५० किलो वजनी गटात कोरियाच्या मिरान चियोनला एक ३९ सेकंदांत चितपट केले. तर, पुढच्या सामन्यात विनेशने कंबोडियाच्या एसमानांग डिट याला ६७ सेकंदांत पराभूत करून उपांत्य फेरीत जागा मिळवली.
हे ही वाचा:
गाडी अपघातात पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीच्या पतीचा मृत्यू; बहीण जखमी!
ईव्हीएममुळे जिंकलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ म्हणतात, ईव्हीएम शंकास्पद!
लॉरेन्स बिश्नोईच्या माणसाची खोटी माहिती देणाऱ्याला अटक
कच्चथीवू बेटाप्रमाणेचं नेहरूंनी कोको बेटे म्यानमारला दिली!
अंतिम सामन्यात पोहोचणाऱ्या दोन कुस्तीपटूंना ऑलिम्पिक पात्रता मिळेल. विनेश निवड चाचणीमध्ये जिंकल्यानंतर ५० किलो वजनी गटात खेळते आहे. हा सामना हरला तरीही ती ५३ किलो वजनी गटात दावेदार असेल, ज्यात अंतिम पंघालने पात्रता मिळवली आहे. अंतिमला आणखी एक चाचणी करण्यास सांगितले जाऊ शकते. अंतिमने किर्गिस्तानच्या कलमिरा बिलिबेकोवा हिला पराभूत केला.
तर, २३ वर्षांखालील विश्वविजेती रितिकाने ७६ किलो वजनी गटात युंजू हवांगला पराभूत केले. त्यानंतर तिने मंगोलियाच्या दावानासान एंख एमारवरही मात केली. चीनच्या जुआंग वांगविरोधात शेवटच्या गटाच्या सामन्यात तिने ८-२ असा विजय मिळवला. मानसी अहलावत (६२) हिने शेवटच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. तिने कजाखस्तानच्या इरिना कुजनेत्सोवा हिला ६-४ असे पराभूत केले.
भारताच्या चार महिला कुस्तीपटूंनी उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले असताना ६८ किलो वजनी गटात निशा दहिया मात्र स्थान मिळवू शकली नाही. तिने पहिल्या फेरीत उत्तर कोरियाच्या सोल गुम पाक हिचा ८-३ने पराभव केला. मात्र नंतर किर्गिस्तानच्या मीरिम जुमानाजारोवाने तिला पराभूत केले. पॅरिस ऑलिम्पिकची शेवटची पात्रता फेरी तुर्कीमध्ये ९मेपासून खेळली जाईल.