भारताने चीनचा ‘तिसरा डोळा’ अर्थात सीसीटीव्हींवर नियंत्रण आणण्याची तयारी सुरू केली आहे. दीर्घकाळापासून चीन या तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने देशातील तमाम घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात सद्यस्थितीत २० लाख सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. देशातील मोठ्या १५ शहरांत ही संख्या १५ लाखांच्या आसपास आहे.
एकट्या दिल्लीत अडीच लाखांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यातील सुमारे ८० टक्के कॅमेरे चीनकडून मागवले आहेत. याच दरम्यान सरकारने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत नवे नियम जाहीर केले आहेत. नव्या नियमांनुसार, भारतात सीसीटीव्हींची विक्री करण्यासाठी कठोर सुरक्षा मानकांचे पालन करण्यासाठी त्यांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. भारताच्या या पावलामुळे चीनच्या हेरगिरी कारवायांवर मोठ्या प्रमाणावर अंकुश बसेल.
हे ही वाचा:
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात; पहिल्या टप्प्यात १०२ मतदारसंघात मतदान
हेलिकॉप्टर दुर्घटनेत केनियाच्या संरक्षणप्रमुखासह नऊ जणांचा मृत्यू!
मध्य पूर्व आशियात युद्ध भडकणार? इराणच्या शहरांवर इस्रायलकडून क्षेपणास्त्र हल्ला
शेवटच्या षटकात बुमराह-कोएत्जीची कमाल; मुंबईची पंजाबवर मात
अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी संवेदनशील क्षेत्रांत चिनी सीसीटीव्हींचा वापर करण्यावर बंदी आणली आहे. तर, भारत सरकारने ९ एप्रिल रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून नवे नियम जाहीर केले आहेत. यानुसार, सीसीटीव्ही उत्पादकांना भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)च्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत आवश्यक सुरक्षा मापदंडासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासण्या अनिवार्य केल्या गेल्या आहेत. हे मापदंड पूर्ण करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी दिला जाईल. हा आदेश ९ ऑक्टोबरपासून लागू होईल.
सरकारने नुकतीच ही अधिसूचना काढल्याची माहिती भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा कोऑर्डिनेटर आणि सायबर सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल राजेश पंत (सेवानिवृत्त) यांनी दिली. आतापर्यंत चीनमधून देशात येणाऱ्या सीसीटीव्हींवर कोणतेही निर्बंध नव्हते. हे कॅमेरे देशातील महत्त्वाच्या म्हणजेच सरकारी इमारती, विमानतळ, महामार्ग, मेट्रो रेल्वे, तमाम मंत्रालयांत बसवण्यात आले आहेत. येथे रेकॉर्ड होणाऱ्या माहितीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते. हे सीसीटीव्ही कॅमेरे सर्वोत्तम तांत्रिक हेरगिरी करणारी साधने आहेत आणि आपल्या देशात अशा प्रकारच्या यंत्रांवर कोणतेही नियंत्रण नसणे ही गंभीर सुरक्षा जोखीम आहे.