इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये जबरदस्त तणावाचे वातावरण असून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. अशातच इस्रायली नागरिकाच्या मालकीचे जहाज इराणने होर्मुझच्या आखातातून ताब्यात घेतले होते. या जहाजावर १७ भारतीय कर्मचारी आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताने इराणशी द्विपक्षीय स्तरावर बोलणी सुरू केलेली आहे. यासंबंधित आता अपडेट समोर आली आहे. इराणने जप्त केलेल्या इस्रायली व्यापारी जहाजाची क्रू मेंबर असलेली एक भारतीय महिला मायदेशात सुखरूप परतली आहे.
इराणने जप्त केलेल्या इस्रायली व्यापारी जहाजाची क्रू मेंबर असलेली भारतीय डेक कॅडेट ऍन टेसा जोसेफ हिचे भारतात आगमन झाल्याचे वृत्त आहे. गुरुवार, १८ एप्रिल रोजी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही महिला सुखरूप पोहचल्याची माहिती आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “तेहरानमधील भारतीय मोहीम आणि इराण सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, केरळमधील त्रिशूर येथील भारतीय डेक कॅडेट ऍन टेसा जोसेफ, जी कंटेनर जहाज MSC Aries च्या भारतीय क्रू सदस्यांपैकी एक होती ती गुरुवारी दुपारी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरली आहे. यावेळी कोचीनचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी यांनी ऍन टेसा जोसेफ यांचे स्वागत केले.
ऍन टेसा जोसेफ ही १७ भारतीय नागरिकांपैकी एक आहे जे नागरिक MSC Aries या इस्रायली जहाजावर इराणने केलेल्या जप्तीनंतर अडकून पडले होत्या. सरकारने हे स्पष्ट केले आहे की, भारतीय मोहिमेंतर्गत ते तेहरानमधील जहाजातील उर्वरित १६ भारतीय क्रू सदस्यांच्या संपर्कात आहेत. क्रू मेंबर्सची तब्येत चांगली असून ते सर्व भारतातील त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच उर्वरित क्रू मेंबर्सचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी भारत इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे इराणचे समकक्ष परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्लाहियान यांच्याशी चर्चा केली होती.
हे ही वाचा:
राज कुंद्रा यांची संपत्ती जप्त, शिल्पा शेट्टीचा फ्लॅटही घेतला ताब्यात!
लहान मुलांच्या नेस्ले सेरेलॅकवर संशय!
गुगलने २८ कर्मच्याऱ्याना कामावरून कमी केले
‘मुंबई इंडियन्सबरोबरच गुजरात टायटन्सलाही बुडवले’
इस्रायलने काही दिवसांपूर्वी सिरियामधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता. त्यात इराणच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्याचवेळी इस्रायलने मात्र या हल्ल्यातील आपला सहभाग नाकारला होता. दोन्ही देशांमधील संघर्ष वाढला असताना इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डने एमएससी एरीज हे होर्मुझमधून जाणारे जहाज शनिवारी ताब्यात घेतले.