लखनऊ येथील अपर्णा ठाकूर या महिलेने अलीकडेच अभिनेता-राजकारणी रवी किशन यांच्यावर आरोप केले आहेत. किशन यांच्या दुसऱ्या विवाहापासून झालेल्या मुलीला किशन हे सामाजिक आणि सार्वजनिकरित्या स्वीकारत नसल्याचा दावा या महिलेने लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. तर, किशन यांची पत्नी प्रीती शुक्ला यांनी अपर्णा ठाकूर यांच्याविरुद्ध हजरतगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अपर्णा यांनी प्रीती यांना धमकावून २० कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार प्रीती यांनी मंगळवारी रात्री उशिरा दाखल केली. तसेच, अपर्णा यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही त्यात त्यांनी केला आहे. तसेच, संपूर्ण रक्कम न दिल्यास रवि किशन यांना खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवले जाईल आणि सर्व कुटुंबीयांची हत्या केली जाईल, अशी धमकीही अपर्णा यांनी दिल्याचे प्रीती यांनी तक्रारीत नमदू केले आहे.
तिच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे अपर्णा यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन रवि किशन यांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या, असे प्रीती यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच, अपर्णा यांचे लग्न ३५ वर्षांपूर्वी झाले असून त्यांना त्यांचे पती राजेश सोनी यांच्यापासून २७ वर्षांची मुलगी आणि २५ वर्षांचा मुलगा असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
भाजपाशासित राज्यांमधून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधी संकोच का करतायत?
रामनवमीच्या दिवशी ‘जय श्री रामा’चा नारा दिल्याने बेंगळुरूमध्ये तीन जणांवर प्राणघातक हल्ला
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून बिहारी कामगाराची गोळ्या झाडून हत्या
अपर्णाचा दावा काय?
‘माझे नाव अपर्णा आहे आणि माझी मुलगी खासदार आणि अभिनेते रवी किशन यांची मुलगी आहे, जिला ते स्वीकारत नाहीत,’ असा दावा अपर्णा यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तसेच, या प्रकरणी कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इरादाही त्यांनी स्पष्ट केला होता.
अपर्णा यांची मुलगी शिनोव्हा हिनेही एक व्हिडिओ शेअर करून तिला योग्य मान्यता आणि हक्क मिळावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले आहे. तसेच, किशन यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी मला त्यांना पोलिसी कारवाईत अडकवायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रवी किशनसोबतच्या विवाहाचा तपशीलही त्यांनी जाहीर केला. त्यांचे लग्न मुंबईतील मालाड येथे १९९६मध्ये झाल्याचा दावा त्यांनी केला. रवी किशन यांनी एकतर औपचारिकपणे मुलगी दत्तक घ्यावी किंवा तिला आपले मूल म्हणून स्वीकारावे, अशी इच्छा अपर्णा यांनी व्यक्त केली आहे.