अनेक वर्षे मेहनत करून खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावतो. पण जेव्हा त्यांना त्यांच्या आवडत्या खेळापासून दूर जाण्यास भाग पडते, तेव्हा अनेकांचा धीर सुटतो. परंतु अशी परिस्थिती समोर ठाकल्यानंतरही बॅडमिंटनपटू कुहू गर्ग मोठ्या हिमतीने सामोरी गेली. कुहूने युपीएससी परीक्षेत १७८वा क्रमांक मिळवला आहे. पण हा यशाचा मार्ग तिच्यासाठी सोपा नव्हता. तिचे वडील अशोक कुमार म्हणाले की, कोविड-१९ महामारीत आजारानंतर कुहूला उबेर कपच्या चाचणीदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तिला एक वर्ष बॅडमिंटन कोर्टवर उतरता येणार नव्हते. तेव्हा तिने नागरी सेवांसाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला.
याआधी कुहूच्या वडिलांनीही भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) काम केले होते. त्यांनी गेल्या वर्षीच निवृत्ती घेतली होती. कुहूचे वडील अशोक कुमार हे नोव्हेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत उत्तराखंडचे डीजीपी राहिले आहेत. सोशल मीडियावर पोस्टद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, आपल्या कुटुंबासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. कुहूने वयाच्या नवव्या वर्षी बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली आणि तिच्या महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या कारकिर्दीत ५६ राष्ट्रीय आणि १९ आंतरराष्ट्रीय पदके जिंकून देशाचा गौरव केला. कुहू गर्गने २०१८ वर्ल्ड चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
हेही वाचा :
टी-२० विश्वचषकात रोहित-विराट करणार सलामीला
कोलकात्याच्या सुनील नारायणची राजस्थानविरुद्ध दमदार खेळी
दिनेश कार्तिक बनणार टीम इंडियाचा फिनिशर?
जॉस बटलरच्या वादळात केकेआर गारद!
कुहू गर्गच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी कदाचित पहिली खेळाडू असेल जिने सहा वर्षे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळले. वर्ल्ड चॅम्पियनशिपची क्वार्टर फायनलही खेळली आणि आता ती आयएएस किंवा आय़पीएस होणार आहे. तिच्या यशाचे श्रेय तिचे वडील अशोक कुमार यांना देताना कुहू गर्ग म्हणाली, बाबा डीजीपी असताना, दररोज अनेकांना मदत करायचे आणि हे सर्व पाहून मलाही प्रेरणा मिळायची. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. मी ती वाचली आहेत. माझ्या यशात माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे.